हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यापूर्वी बुमराचा जलवा

‘टीम इंडिया’चा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यानच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील बहुचर्चित लढतीपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) गतवर्षीच्या (2024) पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू या पुरस्काराने बुमराचा रविवारी दुबईत गौरव करण्यात आला. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमरा सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकलाय, मात्र याच स्पर्धेदरम्यान आयसीसीने त्याचा तब्बल चार पुरस्कार देऊन सन्मान केला. ‘आयसीसी’ने आपल्या अधिकृत ‘एक्स’ हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे. बुमराचा आयसीसी पुरस्कार 2024 मध्ये जिंकलेल्या सर्व पुरस्कारांसह फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये ‘आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर’, ‘आयसीसी पुरुष टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’, ‘आयसीसी पुरुष टेस्ट टीम ऑफ द इयर’, ‘आयसीसी पुरुष टी-20 टीम ऑफ द इयर’ या पुरस्कारांचा समावेश आहे. आयसीसीच्या कसोटी व टी-20 संघात स्थान मिळाल्याबद्दल बुमराचा कॅप देऊन गौरवही करण्यात आला.
Comments are closed.