टीम इंडियानं सांघिक कामगिरीचं बळ दाखवलं, ऑस्ट्रेलियाला लोळवलं, फायनलमध्ये दणक्यात एंट्री

दुबई: रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. भारतानं चार विकेटनं विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये दणक्यात प्रवेश केला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना त्यांनी 264 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. विराट कोहलीनं 94 , श्रेयस अय्यरनं 45  धावा केल्या. केएल राहुलनं नाबाद 42 धावा केल्या. तर, हार्दिक पांड्याच्या 28 धावा गेमचेंजर ठरल्या. भारताच्या या दणदणीत विजयाचं एबीपी माझाचे क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी केलेलं विश्लेषण महत्त्वाचं आहे. ते म्हणाले भारतानं 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला नॉकआऊटमध्ये पराभूत केलं हे महत्त्वाचं आहे.

सुनंदन लेले काय म्हणाले?

भारतानं दणदणीत विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारतानं तब्बल 14 वर्षानंतर नॉक आऊट सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा पद्धतशीर दणका दिलेला आहे,असं सुनंदन लेले म्हणाले. ते पुढं म्हणतात, पद्धतशीर दणका म्हणतो कारण भारतानं बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डींग या तिन्ही क्षेत्रात वरचढ कामगिरी करुन दाखवली. ऑस्ट्रेलियाचं नियोजन प्रथम फलंदाजी करण्याचं होतं. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण ऑस्ट्रेलियाची बॅटिंग हे त्यांचं बलस्थान होतं. पहिल्यांदा बॅटिंग करुन चांगली धावसंख्या उभारायची आणि भारतीय संघावर दडपण आणायचं अशीच योजना त्यांची होती. स्मिथ आणि कॅरी यांच्या अर्धशतकानं ऑस्ट्रेलियानं 264 धावसंख्या करुन दाखवली.

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं मधल्या ओव्हर्समध्ये आमचे फलंदाज कसे तोंड देतात हे म्हत्त्वाचं आहे असं मॅचपूर्वी म्हटला होता. त्याच दरम्यान भारताच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, गोलंदाजी टॉप क्लास झाली आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. 265 ची धावसंख्या भारताच्या आवाक्याबाहेर नव्हती. ऑस्ट्रेलियाची बॉलिंग कमजोर होती. पाठलागाचा बादशाह विराट कोहलीनं सूत्रं हाती घेतली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा लवकर बाद झाले. कोहली आणि श्रेयस अय्यरनं झकास पाटर्नरशीप केली, त्यांनी विजयाचा मार्ग संघाला दाखवला, असं सुनंदन लेले म्हणाले.

विराट कोहली शतकाला 16 धावा बाकी असताना बाद झाला. यानंतर केएल राहुलनं एक बाजू लावून धरली. ऑस्ट्रेलियानं दडपण वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हार्दिक पांड्यानं तीन षटकार मारले अन् दडपण उधळून दिलं आणि भारतानं विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाला नॉक आऊट सामन्यात हरवलं याला महत्त्व आहे. कारण, भारत साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवत होता पण नॉक आऊटमध्ये हरवत नव्हता. विराटची फलंदाजी, शमीची गोलंदाजी अन् केएल राहुल आणि हार्दिक पांड्याची भागिदारी सगळ्याच गोष्टी लक्षणीय ठरल्या, असं सुनंदन लेले म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=4tqxe-cxuks

इतर बातम्या :

Virat Kohli Ind vs Aus : ‘आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत…’ टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?

अधिक पाहा..

Comments are closed.