यंदा ना विजययात्रा, ना जल्लोष; बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या खेळाडूंकडे वेळच नाही

एका तपानंतर हिंदुस्थानने दुबईत मिळवलेल्या विश्वविजयाचा जल्लोष काल अब्जावधी क्रिकेटप्रेमींनी रात्रभर साजरा केला. त्यामुळे 2007 आणि 2024च्या टी-20 जगज्जेतेपदानंतर हिंदुस्थानीच्या जगज्जेत्यांची जशी विजययात्रा मुंबईच्या रस्त्यांवरून काढण्यात आली होती तशीच यात्रा पुन्हा काढली जावी, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची भावना आहे. मात्र बीसीसीआय आणि टीम इंडिया आयपीएलमुळे पुढील दोन महिने खूप व्यस्त होणार असल्यामुळे चॅम्पियन्स यशानंतर यंदा ना विजययात्रा निघणार, ना जल्लोष साजरा होणार, हे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे.
आजवर हिंदुस्थानच्या संस्मरणीय विजयानंतर मुंबईच्या रस्त्यांनी अनेक विजययात्रा अनुभवल्या आहेत. 2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20चे पहिलेवहिले जगज्जेतेपद जिंकले तेव्हा मुंबईत संघाचे न भूतो न भविष्यति… असे स्वागत करण्यात आले होते. तेव्हा मुंबईच्या विमानतळापासून निघालेली लाखो चाहत्यांची शोभायात्रा अफाट समुद्राशी स्पर्धा करत होती. तशीच विजययात्रा गेल्या वर्षी नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमदरम्यान काढण्यात आली होती. या यात्रेत एकाचवेळी दहा लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांनी टीम इंडियाचे अभूतपूर्व स्वागत करत अनोखे स्पिरीट जगाला दाखवले होते. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला गवसणी घातल्यानंतर हिंदुस्थानी संघाची विजययात्रा निघेल असे सर्वांना वाटले होते. मात्र या विजययात्रेसाठी बीसीसीआय आणि टीम इंडियाकडे वेळ नसल्याचे समोर आल्यामुळे हा जल्लोष हवेत विरून जाणार असल्याचे समोर आले आहे. आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमापूर्वी खेळाडूंना विश्रांती मिळावी म्हणून बीसीसीआयने आपला विजययात्रेचा प्लॅन रद्द केला आहे. त्यामुळे जगज्जेते दुबईहून आपापल्या शहरात थेट जाणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे.
विजययात्रा नको, पण सत्कार करावा
हिंदुस्थानी संघाच्या जगज्जेतेपदाचे कौतुक व्हायलाच हवे. पण आता आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. त्यात सारे बिझी होतील. तसेच हिंदुस्थानी संघासाठी जगज्जेतेपद नेहमीचेच झाले आहे. नऊ महिन्यांपूर्वीच हिंदुस्थानने टी-20 चा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे विश्वविजयाबाबत असलेली उत्सुकता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाची विजययात्रा काढण्यासाठी वेळ नसला तरी या जगज्जेत्यांचा थाटात सत्कार करावा. त्यांचे कौतुक करावे. अशी इच्छा क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केली गेली आहे.
कुणाकडेही वेळ नाहीय
येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या रनधुमाळीला प्रारंभ होत आहे. या दोन महिन्यांच्या स्पर्धेसाठी सर्व हिंदुस्थानी खेळाडू पुढील आठवडय़ात आपापल्या संघांत सरावासाठी दाखल होतील. त्यानंतर थेट 25 मेपर्यंत कुणालाही विश्रांती मिळणार नाही. त्यामुळे जगज्जेतेपदानंतर टीम इंडियातील खेळाडूंना घटकाभर विश्रांती मिळावी, त्यांची आणखी दगदग होऊ नये म्हणून बीसीसीआयने आपला विजययात्रेचा प्लॅन यंदा सोडून दिला आहे. तरीही हिंदुस्थानचा बीसीसीआय कशाप्रकारे साजरा करते याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
विधिमंडळाकडून चॅम्पियन्सचे अभिनंदन
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी हे ठराव एकमताने मंजूर केले. हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. या विजयाने तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणारा हिंदुस्थान हा जगातील एकमेव देश ठरला आहे.
Comments are closed.