लाचखोरी प्रकरणात चंदा कोचर यांना दोषी ठरवले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांना 64 कोटी रुपयांच्या लाच घोटाळा प्रकरणी दोषी धरण्यात आले आहे. अॅपेलेट लवादासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. या लवादाने दिलेला सविस्तर निवाडा आता सार्वजनिक करण्यात आला आहे. चंदा कोचर यांच्यावर 300 कोटी रुपयांचे कर्ज संमत करण्यासाठी 64 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
हे प्रकरण व्हिडीओकॉन या एकेकाळी भारतात गाजलेल्या उद्योगसमूहाशी संबंधित आहे. या समूहाने 300 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. ही मागणी संमत करताना चंदा कोचर यांनी ही लाच घेतली होती, असे लवादासमोर सिद्ध झाले आहे. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप आहे. कोचर यांच्या या प्रकरणाची चौकशी प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) केली होती. अॅपेलेट लवादाने ईडीशी सहमत होणारा निष्कर्ष काढून या प्रकरणात आपला निवाडा दिला आहे, अशी माहिती देण्यात आली.
योग्य स्पष्टीकरण नाही
व्हिडीओकॉन उद्योगसमूहाच्या कंपनीला 300 कोटी रुपयांची कर्ज देण्यासंबंधीची योग्य कारणे कोचर स्पष्ट करु शकल्या नाहीत. हे कर्ज दिल्यानंतर एका दिवसाच्या आत व्हिडीओकॉन उद्योगसमूहाच्या या कंपनीने चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्या नूपॉवर रिन्यूएबल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे 64 कोटी रुपये हस्तांतरीत केल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. तसेच व्हिडीओकॉन समूहाच्या ज्या एनआरपीएल या कंपनीला हे कर्ज देण्यात आले, ती कंपनी या उद्योगसमूहाचे मालक वेणुगोपाल धूत यांच्या नावे असली तरी तिचे प्रत्यक्ष नियंत्रण दीपक कोचर यांच्याकडेच होते, हेही तपासात सिद्ध झाले होते. या सर्व मुद्द्यांवर चंदा कोचर स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत. या प्रकरणातल्या पैशाचा मागोवा आणि साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी यांच्या आधारे चंदा कोचर यांना दोषी धरण्यात आले आहे. या निवाड्याच्या विरोधात त्या उच्च न्यायालयात दाद मागू शकतात.
कनिष्ठ प्राधिकरणारवर ताशेरे
कनिष्ठ प्राधिकरणाने (अॅडज्युडिकेटिंग अॅथोरिटी) चंदा कोचर यांची ईडीने गोठविलेली 78 कोटी रुपयांची मालमत्ता मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय 2020 मध्ये देण्यात आला होता. अॅपेलेट लवादाने कनिष्ठ प्राधिकरणाच्या या निर्णयावर आपल्या निवाडा पत्रात ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणातील साक्षी आणि पुराव्यांच्या विरोधात हा निर्णय आहे, असे लवादाने स्पष्ट केले आहे.
बंधनकारक गैरवर्तन
चंदा कोचर यांनी बँकेच्या अधिकारी या नात्याने घेतलेला कर्ज संमत करण्याचा निर्णय, त्यानंतर त्वरित त्यांच्या पतीच्या कंपनीमध्ये कर्जदार कंपनीकडून पैसे हस्तांतरीत होणे आणि या प्रकरणातील इतर पुरावे, यावरुन चंदा कोचर यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांना दोषी धरण्यात येत आहे, असे अॅपेलेट लवादाच्या निवाड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.