वारणाकाठी दरवळला चंदनाचा सुगंध; भादोलेत चाळीस गुंठ्यांत बहरली चंदनाची शेती
पारंपरिक शेतीला फाटा देत हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील प्रयोगशील शेतकरी धोंडीराम दादासो पाटील यांनी आपल्या 40 गुंठे क्षेत्रात चंदनाची शेती केली आहे. वारणा नदीकाठच्या या सुपीक पट्ट्यात सध्या सर्वत्र चंदनाचा सुंगध दरवळत आहे.
पारंपरिक शेती करतानाही ऊस असो किंवा इतर पिकेही उच्च दर्जाची घेण्यात हातखंडा असलेल्या येथील पाटील घराण्यात मोठ्या प्रमाणात शेती असल्याने सातत्याने शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनवे प्रयोग केले जातात. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, शेतातील यांत्रिकी अवजारांचा वापर, मुक्त गोठा ते फळा-फुलांची लागवड, याबाबत परिसरात नावलौकिक असलेल्या कुशाजी पाटील घराणे प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. तर, परिसरासाठी शेतीतील
नवनवीन प्रयोगासाठी प्रयोगशाळच आहे.
शेतकरी धोंडीराम पाटील यांनी आपल्या गट नं. 251 या ‘कुशाजी पाटील मळा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या 40 गुंठे क्षेत्रात चंदनाची शेती केली आहे. सुगंधी गर आणि लवकर परिपक्व होणारी पांढऱ्या चंदनाची लागवड केली आहे. 8 बाय 10 फूट अंतरावर एक झाड याप्रमाणे सरासरी 400 झाडांची लागण केली आहे. तर, चंदनाच्या झाडांच्या मध्ये कडुलिंबाची रोपे लावून छोटेसे कृत्रिम जंगल तयार केले आहे.
कडुलिंब लावण्याबद्दल धोंडीराम पाटील यांनी सांगितले की, चंदनाचे झाड मुळात परावलंबी असून, कडुलिंबाच्या मुळावाटे जमिनीतून शोषल्या जाणाऱ्या पाणी व अन्नद्रव्यावर याची वाढ होते. सरासरी पंधरा ते वीस वर्षांनंतर चंदनाचा बुंध्याचा घेर व त्यमधील तयार झालेला सुगंधी गर, यावरती या झाडाची किंमत ठरते. तर, उर्वरित लाकडाला किमती फर्निचरासाठी मोठी मागणी असते.
चंदनाच्या लागवडीची नोंद महसूल आणि वन विभागाकडे करावी लागते. त्याचा लेखाजोखा काटेकोर ठेवावा लागतो. तसेच, चोरांपासून अत्यंत काळजी घ्यावी लागत असल्याचे पाटील सांगतात.
तीन वर्षांत पंधरा ते वीस फूट उंचीची झाडे व बुंध्याचा सरासरी पाच ते सहा इंचाचा व्यास झाला असून, या झाडांच्या मागणीसाठी महाराष्ट्रासह परराज्यांतील सुगंधी द्रव्ये बनवणाऱ्या कंपन्या आणि औषध निर्माण कंपन्यांबरोबर व्यापारी संपर्कात असून, सद्यस्थितीत संगोपणावर भर दिला आहे. चंदनलागवडीसाठी अत्यल्प पाऊस, मुरमाड आणि हलक्या प्रतीच्या शेतीतही चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. कृषीविषयक मासिकामधून अभ्यास करून चंदनलागवडीचा प्रयोग केला. यासाठी त्यांना पत्नी उषा, पुतणे, सचिन, कपिल आणि गौरव या कुटुंबीयांचीही मदत मिळाल्यानेच चंदन शेतीचा हा प्रयोग केल्याचे धोंडीराम पाटील यांनी सांगितले.
भरघोस उत्पन्नाबरोबरच जोखीमही मोठी
अत्यंत साधारण मुरमाड जमिनीत अत्यल्प पाणी व विना खत, औषधाशिवाय नैसर्गिकरीत्या वाढणारी झाडे पंधरा ते वीस वर्षांच्या कालावधीत प्रत्येक झाडामागे आजच्या बाजारभावात सरासरी 80 हजार ते 1 लाख रुपये उत्पन्न मिळते. या चंदन लागवडीतून होणाऱ्या मोठ्या अर्थिक उत्पन्नाएवढी जोखीमही मोठी असल्याचे धोंडीराम पाटील सांगतात.
Comments are closed.