गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा उद्रेक; ३ मुलांचा मृत्यू.
गांधीनगर:
गुजरातच्या उत्तर अन् मध्य भागातील जिल्ह्यांमध्ये चांदीपुरा व्हायरसचे संक्रमण फैलावले आहे. यामुळे राज्याचा आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क झाला आहे. या घातक व्हायरसच्या संक्रमणामुळे आतापर्यंत 3 मुलांना जीव गमवावा लागला आहे. तर प्रभावित क्षेत्रांमध्ये संक्रमण फैलावण्यापासून रोखण्यासाठी व्यापक पावले उचलण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांनी दिली आहे.
चांदीपुरा व्हायरसमुळे वडोदरा आणि गोध्रा येथील प्रत्येकी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थानातील एका मुलाला उपचारासाठी हिम्मतनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याचाही मृत्यू ओढवला आहे. विसनगर येथील एक मूल या व्हायरसने संक्रमित असून त्याच्यावर वडनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग संशयित रुग्णांचे निरंतर स्क्रीनिंग करत आहे.हा व्हायरस ‘सँड फ्लाय’च्या माध्यमातून फैलावतो. ज्या क्षेत्रांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत, तेथे सँड फ्लायची सक्रीयता दिसून आली आहे. याचमुळे आरोग्यमंत्र्यांनी रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी किटकनाशकांची फवारणी सुनिश्चित करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला आहे. चांदीपुरा व्हायरससाठी सध्या कुठलीही विशेष लस किंवा औषध उपलब्ध नाही.
Comments are closed.