Chandrahar Patil joins Shiv Sena party in presence of Eknath Shinde, alleging Mahavikas Aghadi
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी आज (09 जून) पक्षप्रवेश करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी महाविकास आघाडीवर आरोप केले.
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मात्र या निवडणुकीआधीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबई, कोकणनंतर आता पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच सांगलीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली होती. त्याप्रमाणे आज (09 जून) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी पक्षप्रवेश करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. (Chandrahar Patil joins Shiv Sena party in presence of मराठी, alleging Mahavikas Aghadi)
एक दिवसांपूर्वीच चंद्रहार पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारसोबत जाणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आज पक्षप्रवेश झाल्यावर चंद्रहार पाटील म्हणाले की, माझा कुठल्याही पक्षाबाबत किंवा नेत्याबाबत काहीही आक्षेप नाही. माझा महाविकास आघाडीबाबत आक्षेप आहे. लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्या उमेदवारीबाबत काय झालं ते सगळ्यांनी पाहिलं आहे. शेतकऱ्याच्या मुलाला हरवण्यासाठी महाविकास आघाडी माझ्यासमोर शत्रू म्हणून उभी राहिली होती. पण तरीही मी ती निवडणूक एकटा लढलो, मागे हटलो नाही. त्यावेळी मला 60 हजार मतं मिळाली. ही संख्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जास्त मोठी नाही. कारण चार लाख वगैरे मतं घेऊन मी निवडून येत असतो. पण शेतकऱ्यांचा मुलगा दिग्गजांसमोर उभा होता. खरं तर सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड लागली आहे. त्यामुळे माझ्यासाठी 60 हजार मतं देखील खूप मोठी गोष्ट आहे. मला ताकद मिळाली तर 60 हजार मतं मी सहा लाखांमध्ये बदलू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
हेही वाचा – Mumbra Railway Accident : अपघातात 4 जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना शासनाकडून मदत जाहीर
महाविकास आघाडीने कुठलाही पाठिंबा दिला नाही
अनेकांनी मला विचारलं की, या शिवसेनेतून त्या शिवसेनेत जाण्याचं कारण काय? खरं तर कुस्ती आणि क्रीडा क्षेत्रातले प्रश्न मी आपल्यासमोर आणले. परंतु मी कुस्तीसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी जे काही प्रश्न उपस्थित केले होते, उपोषण केलं होतं, त्यासाठी कुठलाही पाठिंबा मला त्यावेळीही महाविकास आघाडीने दिला नाही. पण आज एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांनी मला क्रीडा क्षेत्रासाठी शब्द दिला आहे. त्यामुळे मला आता कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. कारण चंद्रहार पाटील काय ब्रँड आहे, याची कल्पना अवघ्या महाराष्ट्राला आहे. त्यामुळे भविष्यात मला काम करण्याची संधी दिली तर मी ती प्रामाणिकपणे निभावेन. कारण लाल मातीने आम्हाला प्रामाणिकपणा शिकवला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न मी करेन, असे आज मी आपल्याला आश्वस्त करतो, असेही चंद्रहार पाटील म्हणाले.
हेही वाचा – Narayan Rane : आपण रस्त्यात आलाच आहात तर…, प्रकाश महाजनांच्या टीकेला नारायण राणेंचे प्रत्युत्तर
Comments are closed.