माझा निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास! चंद्रपूरच्या नागरिकाचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार, घरासमोर लावला फलक

चंद्रपूर नागरिक निवडणुकीवर नितीन बनसोड यांचा बहिष्कार

एकीकडे संपूर्ण राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण तापू लागले आहे, तर दुसरीकडे चंद्रपूरमध्ये एका जागरूक नागरिकाने निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदानावर बहिष्कार टाकला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसल्याचे सांगत या नागरिकाने पुकारलेल्या ‘सविनय असहकार’ आंदोलनाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

देशभरात सध्या ईव्हीएम (EVM) आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील रहिवासी नितीन बनसोड यांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ तोंडी विरोध न करता, त्यांनी आपल्या घरासमोर एक फलक लावून आपला निर्णय जाहीर केला आहे.

घरासमोरील फलक वेधतोय लक्ष नितीन बनसोड यांनी आपल्या घराबाहेर लावलेल्या फलकावर स्पष्टपणे नमूद केले आहे की, ‘मला निवडणूक आयोग व त्याच्या प्रक्रियेवर विश्वास नसल्यामुळे मी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहभाग घेणार नाही.’ निवडणूक प्रक्रियेत होणारी कथित ‘मतचोरी’ आणि पारदर्शकतेचा अभाव यावर त्यांनी या माध्यमातून बोट ठेवले आहे.

प्रशासकीय वर्तुळात खळबळ लोकशाहीत मतदानाचा अधिकार पवित्र मानला जात असताना, एका नागरिकाने उघडपणे अशा प्रकारे बहिष्कार जाहीर केल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना, अशा प्रकारचे वैयक्तिक स्तरावरचे आंदोलन यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे करत आहे.

देशभरात निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरून चर्चा सुरू असताना, चंद्रपुरातील हा ‘सविनय असहकार’ नागरिकांच्या मनात दाटून आलेल्या संशयाचे प्रतीक मानले जात आहे.

Comments are closed.