चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस आघाडीची सत्ता, भाजपचा पराभव; जनविरोधी कारभाराला जनतेने नाकारले

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने 66 पैकी 40 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवत महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवला. भाजपला धक्का देत काँग्रेसच्या आघाडीने चंद्रपूर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. फटाके फोडत व गुलाल उधळून हा विजय साजरा करण्यात आला. चंद्रपूर महापालिकेतील भाजपच्या अपयशी आणि जनविरोधी कारभाराला जनतेने नाकारले, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
महागाई, बेरोजगारी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा, बोगस पट्टे वाटप, कोटय़वधींचे घोटाळे आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे भाजपविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष होता. या निवडणुकीत जनतेने त्याचा स्पष्ट निकाल दिला आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. विजयानंतर काँग्रेस कार्यालयासह शहरातील विविध भागांत विजयोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
असे आहे सत्तेचे गणित…
चंद्रपूर निवडणुकीत काँग्रेसचे 28 नगरसेवक जिंकले असून जनविकास सेना यांचे तीन नगरसेवक काँग्रेसबरोबर आहेत. पक्षाने तिकीट न दिलेले आणि बंडखोरी करून दोन अपक्ष उमेदवार हे निवडून आले आहेत. तेदेखील चंद्रपुरात काँग्रेसबरोबर आहेत. शिवसेनेने 6 जागा जिंकल्या आहेत. या आकडेवारीच्या जोरावर चंद्रपुरात भाजपची सत्ता मोडून काढत काँग्रेस आघाडीची सत्ता महापालिकेत स्थापन होणार आहे.

Comments are closed.