Chandrapur News – चंद्रपूर जिल्ह्यातील 598 गावातील पाणी प्रदूषित, 393 नमुने फ्लोराइडयुक्त आढळले

चंद्रपूर जिल्ह्यात पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित आढळले आहे. जिल्ह्यातील एकूण 598 गावे जल प्रदूषणाने बाधित असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासले. यासाठी 21 हजार 168 नमुने घेण्यात आले. या नमुन्यांचा अभ्यास केल्यावर जे निष्कर्ष समोर आले, ते अतिशय धक्कादायक आहेत. यात सर्वात गंभीर म्हणजे 393 नमुने फ्लोराइडयुक्त आढळून आले.

फ्लोराईडमुळे हाडांचे आजार बळावतात. दातांचा रंग बदलतो. हाताची बोटे वाकडी होतात. याशिवाय नायट्रेट, क्षार, लोह आणि जीवाणूबाधित पाणी आढळून आले. पिण्यासाठी अयोग्य असे हे पाणी आजही नागरिक पीत आहेत. त्यामुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना स्वच्छ पाणी देण्याचा दावा करीत असले तरी वास्तविकता किती भयानक आहे, हे यावरून दिसून येते. ही सर्व माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नदीवरून होणारा सार्वजनिक पाणी पुरवठा असो, विहिरी असो वा बोअरवेल, या सर्वच स्रोतांमध्ये विविध प्रकारचे दूषित घटक आढळले आहेत. यावर वेळीच आळा घातला नाही, तर मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असा इशारा अभ्यासकांनी दिलाय.

  • तपासलेले एकूण नमुने : 21168
  • फ्लोराइडयुक्त नमुने : 393
  • नायट्रेटयुक्त नमुने : 755
  • क्षारयुक्त नमुने 100
  • लोहखनिजयुक्त : 06
  • जिवाणूबाधित नमुने 316
  • वरील प्रदूषणाने बाधित एकूण गावे : 598

तालुकानिहाय दुषित गावे

  • चंद्रपूर : 39
  • भद्रावती : 39
  • वरोरा : 72
  • चिमूर : 36,
  • नागभीड : 52
  • ब्रम्हपुरी : 71
  • मूळ: 49
  • गोंडपिंपरी : 22
  • राजुरा : 29
  • सावली : 61
  • बल्लारपूर : 09
  • कोरपना : 41
  • सिंदेवाही : 53
  • पोंभुर्णा : 15
  • जीवती : 10 गावे

Comments are closed.