सत्याचा शोध – दृष्ट… एक लागणे

>> चंद्रसेन टिळेकर

नजर लागणे, दृष्ट लागणे आणि त्यामुळे काहीतरी अनिष्ट घडणे, कुणीतरी आपल्यावर `करणी’ केली आहे असा ग्रह करून घेणे या अंधश्रद्धा गाडल्या तरच आपले भले होणार आहे. कारण अंधश्रद्धा हे विकासाच्या गाडग्याला पडलेले छिद्र आहे. जोपर्यंत ते आपण बुजवत नाही तोपर्यंत आपण वरून विकासाचे कितीही पाणी ओतले तरी ते गाडगे भरले जाणार नाही.

दृष्ट लागावे असे ते दृश्य होते , दृष्ट लागावे असे ते सौंदर्य होते, दृष्ट लागावे असे सारे काही होते

आनंदित होऊन जावे असे एखादे दृश्य किंवा कृती आपल्या पाहण्यात आली की, हे आपोआपच आपल्या मुखातून असे गौरवोद्गार प्रकट होतात. साद-प्रतिसाद देण्याचा आपला हा उत्कट आविष्कार असला तरी त्यामागे अनवधानाने म्हणा किंवा कळत नकळत म्हणा, एका अपसमजाला म्हणजेच अंधश्रद्धेला बळकटी देत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही. ती अंधश्रद्धा म्हणजे कोणाची तरी दृष्टी किंवा नजर, वाईट म्हणजे अशुभ असते आणि अशी नजर एखाद्या चांगल्या गोष्टीवर पडली तर तिचा विध्वंस होतो, तिची मोडतोड होते, इतकेच नव्हे तर काही प्रसंगी ती संपूर्ण नष्टही होते. माझ्या एका मित्राने जनरल मोटरच्या कंपनीची `ओपेल’ ही इम्पोर्टेड ब्रँड न्यू कार घेतली. दुर्दैवाने महिनाभरातच त्या गाडीने रस्त्यात पेट घेतला आणि गाडीचे बरेच नुकसान झाले. त्याच्या मनात कोणीतरी भरवले की, कोणीतरी तुझ्या वाईटावर आहे. त्याला तुझी ही प्रगती बघवली नाही. त्यानेच तुझ्या इतक्या भारी गाडीला `नजर’ लावली असणार! आमच्या त्या सुविद्य मित्रालाही ते पटले असावे. कारण तोही काही दिवस असेच म्हणत होता. प्रत्यक्षात खरे कारण पुढे समजले ते संपूर्णत तांत्रिक स्वरूपाचे होते.

हे असे नजर लागणे किंवा दृष्ट लागणे आणि त्यामुळे काहीतरी अनिष्ट घडणे यावर आपल्या सुशिक्षित, सुविद्य व्यक्तींची जर श्रद्धा बसत असेल तर आमच्या शिक्षण पद्धतीत काहीतरी वैगुण्य असले पाहिजे अशी शंका जी वारंवार घेतली जाते ती अगदीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही. उदाहरणार्थ महाविद्यालयात विज्ञानाचे नियम शिकवताना एक नियम शिकवला जातो तो म्हणजे, ‘noting can be created out of nothing’! सोप्या भाषेत सांगायचे तर `आपल्याकडे काहीच नसेल तर नुसते हात हलवून काहीही निर्माण करता येत नाही’ हे शिकवून झाल्यावर शिक्षकाने, प्राध्यापकाने विद्यार्थांना स्पष्ट करून सांगितले पाहिजे की, या नियमाच्या विरुद्ध जाऊन कुणीही गुरू, स्वामी कितीही मोठा कीर्तिवंत असला तरी तो नुसता हात फिरवून हिऱयाची अंगठी, किमती घडय़ाळ, सोनेनाणे काढीत असेल तर त्याच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. भले मग त्याच्याकडे कुठल्याही क्षेत्रातील कुणीही नामवंत जावो.

ही अंधश्रद्धा केवळ अमूर्त अशा वस्तू किंवा वास्तूच्या बाबतीतच खरी मानली जाते असे नाही, तर दुर्दैवाने मनुष्यप्राण्यावरही तिचा अंमल होतो असे मानले जाते आणि त्यातूनच अनेकदा अनपेक्षित प्रसंग ओढवतात. इतर अंधश्रद्धांप्रमाणे याही अंधश्रद्धेची प्रमुख बळी कोण असेल तर ती आहे स्त्राr ! काही स्त्रियांची, विशेषत: वांझ स्त्राrची नजर तर अत्यंत वाईट समजली जाते. विधवा, परित्यक्त्या यादेखील या अंधश्रद्धेतून वेळप्रसंगी सुटलेल्या नाहीत. म्हणूनच नि:संतान स्त्राrकडे इतर स्त्रिया आपले तान्हे मूल सहसा देत नाहीत. या अंधश्रद्धेचा वापर दृश्य माध्यमेही आपल्या फायद्यासाठी पूर्वी करताना दिसत. एका जाहिरातीमध्ये तान्हे मूल खूप रडताना दाखवले आहे. शेजारीण येऊन विचारते की, “का गं, बाळ असं सारखं रडतंय?” तेव्हा मुलाची आई म्हणते, “काय समजत नाही. चांगले खेळत होते. आताच शेजारच्या यमुनाबाई येऊन गेल्या. त्यांच्या मांडीवरही खेळत होते.” तशी ती शेजारीण रागाने म्हणते, “तू वेडी की खुळी? ती यमुनाबाई वांझोटी आहे हे तुला माहीत नाही का? वांझ बाईची नजर वाईट असते हे माहीत नाही का तुला?” मग ते दृश्य थांबवून सुरक्षा कवच मुलाच्या गळ्यात दाखवून त्या कवचावर पडलेली नजर कशी परावर्तित होते ते त्या जाहिरातीत दाखवले होते. प्रश्न असा पडतो की, प्रबोधन करणे फक्त समाजसुधारकांचेच काम आहे का ?

नजर लागल्याची शंका आली तर ग्रामीण भागात ती उतरविण्याची एक वेगळीच पद्धत आहे. ज्या मुलाला नजर लागली आहे अशी शंका असेल त्याच्यावरून मीठ, मिरच्या ओवाळून त्या चुलीत टाकल्या जातात. त्यांच्या तडतडण्याचा आवाज होतो. असा आवाज आला म्हणजे नक्कीच नजर लागली होती, असा पक्का समज होतो. त्यातून तो आवाज मोठा झाला की, नजर अत्यंत दुष्ट होती असाही ग्रह करून घेतला जातो. गंमत म्हणजे पांढरे पाय जसे कधी पुरुषाचे नसतात. फक्त स्त्राrचे असतात तसेच या अंधश्रद्धेचे आहे, ते म्हणजे फक्त स्त्राrची नजर वाईट असू शकते. पुरुषाची तशी कधीच नसते. हसावे की रडावे, तेच कळत नाही!

हा ग्रह म्हणजेच दृष्ट लागते ही अंधश्रद्धा आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण याची पुढची पायरी म्हणजे आपल्या वाईटावर असलेल्या कुणीतरी आपल्यावर `करणी’ केली आहे असा ग्रह करून घेणे.

महाराष्ट्रात, विशेषत कोकणात या अंधश्रद्धेवर गाढ श्रद्धा असलेली आपल्या अनुभवास येते. असा भ्रम पसरविण्यात अर्थातच नेहमीप्रमाणे बुवा, महाराज, मांत्रिक तसेच गावी देवऋषी आघाडीवर असतात. या अंधश्रद्धेमुळे अनेकदा गावात हाणामाऱया झालेल्या आपण पाहतो. एका अंधश्रद्धेतून दुसरी अंधश्रद्धा निर्माण होते. मग ती नजर दृष्ट लागणे असो वा दुसरी कुठली! जितक्या लवकर आपण या अंधश्रद्धा गाडू, तितके आपले भले होणार आहे. कारण अंधश्रद्धा हे विकासाच्या गाडग्याला पडलेले छिद्र आहे. जोपर्यंत ते आपण बुजवत नाही तोपर्यंत आपण वरून विकासाचे कितीही पाणी ओतले तरी ते गाडगे भरले जाणार नाही! यापेक्षा अधिक काय सांगावे?

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक
असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)

Comments are closed.