…तर तुम्ही खुशाल माझी टिंगल करा! – चंद्रशेखर बावनकुळे
माझे व्यंग काढून किंवा माझ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळत असेल, तर खुशाल मिळू द्या. मी त्यावर काहीही बोलणार नाही. माझ्यावर टीका केल्याने न्याय मिळणार असेल, तर त्यांनी माझी खुशाल टिंगल करावी, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. माझ्या घरातही माझी पत्नी, नातू, वडील, मुले आणि बहीण आहे. या टीकांचा त्यांनाही खूप त्रास होतो, असे सांगताना बावनकुळे भावुक झाले.
कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सभांमधून बावनगुरुळे यांच्यावर एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली तर कधी त्यांच्या दिसण्यावरूनही व्यंगात्मक टोले लगावले.
बावनकुळे यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मी कधीच जातीपातीचे राजकारण करत नाही. महसूल विभागाने आतापर्यंत २२ लाख कुणबी जात प्रमाणपत्रे दिली आहेत. यातील एखाद्या प्रमाणपत्रात त्रुटी असल्याच्या संशयावरून चौकशी लावली होती आणि तीदेखील आता पूर्ण झाली आहे-जात पडताळणी अहवाल देण्याचे काम माझ्या महसूल विभागाचे नाही तर ते समाजकल्याण विभागाचे आहे.
आपला कोणत्याही जातीवादाशी संबंध नाही. माझी पत्नी कुणबी आहे तर माझी सून मराठा आहे. आम्ही कधीही कुणबी, तेली किंवा मराठ असा वाद करत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
Comments are closed.