चौथ्या टी-20 मध्ये सॅमसन बाहेर, हर्षितचं पुनरागमन होणार का? जाणून घ्या टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
होबार्टमध्ये मिळालेल्या विजयानंतर टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे (T20 series IND vs AUS). आता चौथा आणि महत्त्वाचा सामना 6 नोव्हेंबर रोजी क्वीन्सलँडमध्ये खेळवला जाणार आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रदर्शन अफलातून होते. अर्शदीप सिंगने जबरदस्त गोलंदाजी करत 3 बळी घेतले.
फलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने आपल्या आक्रमक खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम हेच दमदार प्रदर्शन चौथ्या टी-20 मध्येही कायम ठेवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहेत. दुसरीकडे, यजमान संघ पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत असेल. पाहूया चौथ्या टी-20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये कोणते बदल होऊ शकतात.
दुसऱ्या टी-20 मध्ये खराब फलंदाजी केल्यानंतर संजू सॅमसनला (Sanju Samson) होबार्ट सामन्यात प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले होते. त्याच्या जागी जितेश शर्माला संधी (Jitesh Sharma) देण्यात आली आणि त्यानेही टीम मॅनेजमेंटचा विश्वास पूर्णपणे जिंकला. जितेशने फक्त 13 चेंडूत 22 धावा करून चांगली खेळी केली. त्यामुळे चौथ्या टी-20 मध्येही कर्णधार सूर्यकुमार यादव जितेशलाच आणखी एक संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजू सॅमसनला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागू शकते.
तिसऱ्या टी-20 मध्ये शिवम दुबे (Shivam Dube) गोलंदाजीत प्रभाव पाडू शकला नाही. त्याने 3 षटकांत तब्बल 43 धावा दिल्या आणि फलंदाजीत त्याला संधीच मिळाली नाही. त्यामुळे चौथ्या टी-20 साठी टीम इंडिया हर्षित राणाला (Harshit Rana) पुन्हा संधी देऊन बॉलिंग अटॅक मजबूत करण्याचा विचार करू शकते. हर्षितने दुसऱ्या टी-20 मध्ये फलंदाजीतही योगदान दिलं होतं आणि 35 धावा केल्या होत्या.
वॉशिंग्टन सुंदरने मिळालेल्या संधीचा उत्कृष्ट फायदा घेत 23 चेंडूत 49 धावा करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग-11: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, शिवम दुबे / हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
			
											
Comments are closed.