संगमेश्वर पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत राडा; राजीवलीमध्ये आचारसंहितेचा भंग, 7 जणांवर गुन्हा दाखल
संगमेश्वर तालुक्यातील राजीवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचा एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले असून याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
च्या
तक्रारदार शंकर भागोजी येडगे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पांडुरंग बाबु येडगे, सुरेश बाबु येडगे, सुरेश धोंडीबा येडगे, तुकाराम विठ्ठल येडगे, जनार्दन धोंडीबा येडगे, संतोष विठ्ठल येडगे आणि प्रकाश धोंडीबा येडगे यांनी संगनमत करून तक्रारदाराला शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत संगमेश्वर पोलिसांनी विविध कलमान्वये कारवाई केली आहे. यात प्रामुख्याने बेकायदेशीर जमाव जमवणे, धोकादायक शस्त्रांनी किंवा साधनांनी दुखापत करणे, फौजदारीपात्र धाक दाखवणे आणि शांतता भंग करणे या कलमांनुसार संशयित आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश कोलगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
एकीकडे प्रशासन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे आचारसंहितेच्या काळात कायदा हातात घेण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनेमुळे निवडणूक काळात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवली असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Comments are closed.