कबुतर जा ना! पक्षी घरं सोडेनात, गाड्यांच्या धडकेत शेकडो मृत्यू

दादरमधील कबुतरखाना पालिकेने प्लॅस्टिक कपडय़ाने झाकून त्या ठिकाणी पक्ष्यांना खाद्य टाकण्यास बंदी केल्यानंतरही कबुतरे हटायला तयार नाहीत. अचानक खाद्य मिळणे बंद झाल्याने हजारो कबुतरांनी बंदिस्त कबुतरखान्यावर ठाण मांडले आहे. अनेक कबुतरे अस्ताव्यस्तपणे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडकून मृत्यू पावत आहेत. तर काही पक्ष्यांचा अन्न-पाण्याविना तडफडून मृत्यू होत असल्याने विचित्र स्थिती उद्भवली आहे.

पक्षीप्रेमींमधून पालिकेच्या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पक्ष्यांची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी उघडय़ावर खाद्य टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. यानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून दादर पश्चिम येथील कबुतरखाना बंदिस्त करण्यात आला आहे, मात्र या ठिकाणी हजारो कबुतरे असल्याने अचानक झालेल्या या कारवाईमुळे कबुतरांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कबुतरे दादर स्टेशन परिसरात मिळेल त्या ठिकाणी बसत आहेत. या कबुतरांना पक्षीप्रेमींकडून दाणे टाकले जात आहेत, तर पोलिसांकडून दाणे टाकणाऱयांना हुसकावून लावले जात आहे.

कबुतरांच्या बचावासाठी पक्षीप्रेमींचा खडा पहारा

एकीकडे कबुतरखाना बंदिस्त केल्याने कबुतरांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने काही पक्षीप्रेमींकडून या ठिकाणी खडा पहारा देण्यात आला आहे. गाडय़ांच्या समोर आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी कबुतरांच्या बचावाचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय कबुतरांना खाद्य दिले जात आहे.

महिनाभरात 25 हजारांचा दंड

उघडय़ावर सार्वजनिक ठिकाणी प्राणी-पक्ष्यांना खाऊ घालणे कायद्याने बंदी असल्याने पालिकेकडून गेल्या महिनाभरात दादर कबुतरखाना येथे केलेल्या कारवाईत 58 जणांकडून प्रतिगुन्हा 500 रुपयांप्रमाणे 25 हजार 700 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शिवाय नियम मोडणाऱया एकाविरोधात एनसी तर एकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

स्वच्छतेसाठी पालिकाही रस्त्यावर

बंदी असताना काही जणांकडून पक्ष्यांना खाद्य घातले जात असल्यामुळे पालिकेने घनकचरा विभागाचे पाच ते दहा कर्मचारी या ठिकाणी तैनात केले आहेत. या कर्मचाऱयांकडून कबुतरांना दाणे टाकणाऱयांना अटकाव केला जात असून स्वच्छता राखण्याचे काम केले जात आहे.

Comments are closed.