मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवर आरोपपत्र दाखल.
पहलगाम हल्ल्यासंबंधी लवकरच अभियोगास प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यासंबंधीच्या अभियोगाला लवकरच प्रारंभ होणार आहे. हा दहशतवादी हल्ला ज्या दहशतवाद्यांनी केला, त्यांचा नंतर एन्काऊंटर करण्यात आला आहे. तथापि, नियमानुसार त्यांच्या विरोधातही या अभियोगात आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे. ही माहिती एनआयएच्या विश्वसनीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
या दहशतवादी हल्ला प्रकरणी एनआयएने आरोपपत्र सज्ज केले आहे. या आरोपपत्रात अनेकांची नावे प्रमुख आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आलेली आहेत. पहलगाम हल्ला तीन दहशतवाद्यांनी केला होता. या सर्व तीन दहशतवाद्यांना नंतरच्या चकमकीमध्ये ठार करण्यात आले आहे. तथापि, औपचारिकरित्या त्यांचीही नावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. या तीनही दहशतवाद्यांना ‘महादेव अभियाना’च्या अंतर्गत ठार मारण्यात आले होते.
व्यापक कारस्थानाचा भाग
पहलगाम हल्ला हा एकटा-दुकटा हल्ला नव्हता. तर तो एका व्यापक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांना काही स्थानिक लोकांनी साहाय्य केले होते. या स्थानिक नागरीकांना या दहशतवाद्यांचा उद्देश माहीत होता. तरीही त्यांनी त्यांना तात्पुरता आसरा देणे, त्यांना सामग्रीचा पुरवठा करणे तसेच त्यांचे वाटाडे म्हणून काम करणे, अशा विविध मार्गांनी साहाय्य केले आहे. यामुळे हे दहशतवादी सुरक्षा सैनिकांना हुलकावणी देत हल्ल्याच्या पूर्वी पहलगामच्या आसापासच्या वन भागात फिरत राहिले. ज्या भागात सुरक्षा सैनिक नाहीत, त्या भागात त्यांनी हा हल्ला केला. या भागाची माहिती त्यांना स्थानिकांनीच दिली, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
सज्जाद जाट याची भूमिका
या आरोपपत्रात सज्जाद जाट नावाच्या लष्कर ए तोयबाच्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. हा दहशतवादी या हल्ल्याच्या योजनेत आणि प्रत्यक्ष हल्ल्यात प्रामुख्याने कार्यरत होता. तोही या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या त्रिकूटाला एकमेकांच्या संपर्कात ठेवण्याचे आणि त्यांच्या संपर्काचे सूत्रसंचालन करण्याचे महत्वाचे कार्य त्याने केले होते. त्यामुळे तोही मुख्य आरोपी आहे, अशी माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
पुराव्याचे संकलन कसे…
दहशतवाद्यांचे कॉल रेकॉर्डस्, त्यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक साधने, डिजिटल साधने आणि हल्ल्याच्या स्थानावरुन संकलित करण्यात आलेले पुरावे या साऱ्यांच्या आधारे आरोपपत्र सज्ज करण्यात आले आहे. सर्व आरोपींच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणा’कडे (एनआयए) भक्कम पुरावा असून आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळेल अशा प्रकारचे हे पुरावे आहेत, हे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
‘महादेव अभियाना’चे यश
पहलगाम हल्ल्यानंतर त्वरीत या हल्ल्याच्या तपासाची सूत्रे राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाकडे सोपविण्यात आली. प्राधिकरणाने हल्ला झालेला सारा भाग पिंजून काढला होता. घटनास्थळावरुन महत्वाचे पुरावे संकलित केले. भारतीय सेनेच्या आणि गुप्तचरांच्या साहाय्याने हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. हे तीन्ही दहशतवादी एका स्थानी आल्यानंतर त्यांना चहूबाजूंनी कोंडण्यात आले. दहशतवाद्यांनी स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी गोळीबार केला. नंतर प्रत्युत्तरात त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला. या सर्व अभियानाला ‘महादेव अभियान’ असे नाव देण्यात आले होते या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करणे, एवढेच या अभियानाचे ध्येय नव्हते. तर या हल्ल्यामागच्या व्यापक कट शोधून काढणे, कटात सहभागी असणाऱ्या लोकांचा पर्दाफाश करणे आणि हे दहशतवादी ज्या कटाचा भाग होते, त्या कटाची पाळेमुळे उध्वस्त करणे, असे व्यापक ध्येय योजून हे अभियान हाती घेण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
ठार झाल्यानंतही नाही सुटका
ड ठार झाल्यानंतरही क्रूर दहशतवाद्यांची सुटका नाही. आरोपपत्र होणारच
ड स्थानिकांनी सक्रीय सहकार्य केल्यानेच झाला पहलगाम दहशतवादी हल्ला
ड एनआयएकडे सर्व आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावा असल्याचे प्रतिपादन
ड आरोपपत्र सादर झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष अभियोग सुनावणीला प्रारंभ
Comments are closed.