डॉ. कुरुलकरविरुद्ध आरोप निश्चिती; खटल्याची आजपासून सुनावणी
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध अखेर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर या प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याप्रकरणी 20 जूनपासून खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ होणार आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार या काम पाहत आहेत, तर आरोपीतर्फे ऍड. ऋषिकेश गानू आणि ऍड. राघव पुराणिक बाजू मांडत आहेत. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गोपनीय असलेली माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरविल्याप्रकरणी कुरुलकर याला दहशतवाद विरोधी पथकाने 4 मे 2023 रोजी अटक केली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध 30 जून 2023 रोजी 2 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
Comments are closed.