Chargesheet filed against eight people in 14 crore 57 lakh khichdi scam case


वैष्णवी किचन/सह्याद्री रिफ्रेशमेंटचे भागीदार सुनील रामचंद्र कदम ऊर्फ बाळा कदम, राजीव नंदकुमार साळुंखे, सुजीत मुकूंद पाटकर, फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार संजय चंद्रकांत माशिलकर, प्रांजल संजय मशिलकर, प्रितम संजय मशिलकर, सुरज सतीश चव्हाण, अमोल गजानन किर्तीकर यांच्याविरुद्ध खिचडी घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र सादर करण्यात आले आहेत.

मुंबई : खिचडी घोटाळ्याप्रकरणी आठ आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी आज (09 मे) किल्ला न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. त्यात वैष्णवी किचन/सह्याद्री रिफ्रेशमेंटचे भागीदार सुनील रामचंद्र कदम ऊर्फ बाळा कदम, राजीव नंदकुमार साळुंखे, सुजीत मुकूंद पाटकर, फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार संजय चंद्रकांत माशिलकर, प्रांजल संजय मशिलकर, प्रितम संजय मशिलकर, सुरज सतीश चव्हाण, अमोल गजानन किर्तीकर यांचा समावेश आहे. (Chargesheet filed against eight people in 14 crore 57 lakh khichdi scam case)

एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीत हा संपूर्ण घोटाळा झाला असून आरोपींनी 14 कोटी 57 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेकडून खिचडीचे वाटप करण्यात आले होते. या खिचडी वाटपात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा आरोप झाला होता. या आरोपानंतर दोन वर्षांपूर्वी गोपाळ पांडुरंग लावणे यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने 406, 420, 465, 468, 471, 120 बी, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. याच गुन्ह्यांत वैष्णवी किचन, सह्याद्री रिफ्रेशमेंट, फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसशी संबंधित संचालकांसह कंपनीशी संबंधित आठजणांची पोलिसांनी चौकशी केली होती.

हेही वाचा – IPS Transfers : राज्य पोलीस दलातील सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या; दोघांना पोलीस महासंचालकापदी बढती

त्यात एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीत या आरोपींनी गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून संगनमत करून मनपाच्या खिचडी वाटपाचे पात्रता निकषांमध्ये बसत नसलेले तसेच 300 ग्रॅम खिचडी पॅकेट द्यायचे आहे हे माहित असताना गैरमार्गाने खिचडी वाटपाचे कार्यादेश प्राप्त करून मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केल्याचे उघडकीस आले होते. 100 ते 200 ग्रॅम खिचडी पॅकेटसाठी 22 ते 24 रुपे प्रती पॅकेटचे दर ठेवण्यात आले होते. मात्र मनपाकडून त्याच पॅकेटसाठी 33 रुपये प्रति पॅकेट अधिक जीएसटी याप्रमाणे रक्कम घेण्यात आली होती.

संजय मशिलकर, प्रांजल मशिलकर, प्रितम मशिलकर यांनी संगनमत करुन स्नेहा कॅटरर्सचे संजय माळी यांच्याकडून खिचडी बनवून घेताना मनपाला खिचडी वाटप योजनेविषयी कुठलीही माहिती दिली नव्हती. त्यांचा खाद्यपदार्थ आणि आरोग्य परवाना वापरून खिचडी वाटप योजनेसाठी पात्र नसलेले माहिती असताना मनपाकडून सुरज चव्हाण, अमोल किर्तीकर यांच्या मदतीने खिचडी वाटपाचे कार्यादेश प्राप्त केले होते. त्यात 14 कोटी 57 लाखांचा आर्थिक घोटाळा झाला होता. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होताच संबंधित आठही आरोपींविरुद्ध आज किल्ला न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या गुन्ह्यांत इतर आरोपीविरुद्ध नंतर पुरवणी आरोपपत्र सादर केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – Shivsena : शिवसेनेत इनकमिंग सुरूच, उद्धव ठाकरेंना दणका देत या नेत्यांनी केला पक्षप्रवेश



Source link

Comments are closed.