फक्त इंधन भरण्यासाठी विमान उतरलं आणि तब्बल ६० तास अडकलं; दुबई विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल
युद्धाचे परिणाम हे फक्त संघर्ष सुरू असलेल्या दोन देशांवर नाही तर विविध देशांवर, व्यक्तीवर त्याचा प्रभाव दिसतो. इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण असा संघर्ष मध्यपूर्वेत पाहायला मिळत आहे. हा संघर्ष लवकर निवळेल अशी शक्यता देखील दिसत नाही. त्यामुळे चिघळत चालेला हा संघर्ष आता जगभरातील विविध गोष्टींवर परिणाम करताना दिसत आहे. अशातच अवघ्या अर्धा तासासाठी दुबई विमानतळावर उतलेल्या विमान प्रवाशांना तब्बल ६० तास खोळंबून रहावे लागल्याची एक घटना समोर आली आहे.
व्हिएतनामच्या फु क्वोक (Phu Quoc) येथून पोलंडमधील पोझ्नान (Poznan) कडे जाणाऱ्या ‘2W7508’ या चार्टर विमानाचा प्रवास एका थरारक अनुभवात बदलला. २८ फेब्रुवारी रोजी इंधन भरण्यासाठी हे विमान दुबईत अवघ्या काही वेळासाठी उतरले होते, मात्र मध्यपूर्वेतील युद्धामुळे ते तब्बल ६० तास तिथेच अडकून पडले. इंधन भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच, इराणने आखाती देशांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अचानक बंद करण्यात आल्याने हा प्रकार घडला.
युद्धामुळे विमानतळ झाले ठप्प
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. या हल्ल्यांमुळे दुबईसह अबू धाबी, दोहा, रियाध आणि मनामा यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात भीतीचे वातावरण पसरले आणि खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ बंद करण्यात आले.
३ मार्च रोजी प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला
अनेक दिवसांच्या अनिश्चिततेनंतर, संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) विमान वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
‘Flightradar24’ ने दिलेल्या माहितीनुसार, ६० तासांहून अधिक काळ दुबईत अडकलेले हे चार्टर विमान अखेर ३ मार्च रोजी पोलंडसाठी रवाना झाले. सुमारे ७ तास ३७ मिनिटांच्या प्रवासानंतर हे विमान मंगळवारी सकाळी ९:२७ वाजता (हिंदुस्थानच्या वेळेनुसार दुपारी २ वाजेच्या सुमारास) पोलंडमध्ये सुरक्षितपणे उतरले.
जगातील सर्वात व्यस्त विमानतळाची ऐतिहासिक कोंडी
जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून ओळखले जाणारे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या संकटामुळे सर्वाधिक बाधित झाले आहे. एरवी २४ तास गजबजलेल्या या विमानतळावरील विमानांची ये-जा ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.
२ मार्च २०२६ च्या आकडेवारीवरून या विमानांच्या विस्कळीतपणाची भीषणता स्पष्ट होते:
त्या दिवशी संपूर्ण विमानतळावर केवळ २० विमानांची हालचाल झाली.
यामध्ये १६ उड्डाणे (Take-offs) आणि केवळ ४ लँडिंग्सचा समावेश होता.
सामान्यतः या विमानतळावरून दररोज एक हजाराहून अधिक विमानांची ये-जा होत असते. गेल्या आठवड्यातच येथे ५,६५४ हालचालींची नोंद झाली होती, ज्यामध्ये २,८३० उड्डाणे आणि २,८२४ लँडिंग्सचा समावेश होता. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे हा गजबजलेला मार्ग आता शांत झाला आहे.
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे चार्टर फ्लाइट दुबईमध्ये 60 तास अडकले
व्हिएतनाम ते पोलंडला जाणारे चार्टर फ्लाइट दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 60 तासांहून अधिक काळ इराणी क्षेपणास्त्र आखाती हल्ल्यानंतर हवाई क्षेत्र बंद पडल्यामुळे अडकले होते.
Comments are closed.