देशविदेश बातम्या – चॅटजीपीटीचा हिंदुस्थानात मोठा वापर

हिंदुस्थानात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर झपाटय़ाने वाढत असल्याचे दिसत आहे. याचा पुरावा म्हणजे ‘ओपनएआय’चा अहवाल. ओपनएआयच्या अहवालानुसार हिंदुस्थानातून पाठवले जाणारे जवळपास निम्मे चॅटजीपीटी संदेश 18 ते 24 वयोगटातील तरुणांकडून पाठवले जातात. एकंदरीत 30 वर्षांखालील युजर्स सुमारे 80 टक्के ऑक्टिव्हिटी चालवत आहेत. त्यामुळे भारतातील तरुण पिढी एआय साधनांचा वेगाने स्वीकार करत असल्याचे दिसून येते.

अबूधाबीच्या प्रवाशाने 135 ग्रॅम सोने गिळले

अहमदाबाद सीमाशुल्क विभागाने शनिवारी अबू धाबीहून आलेल्या एका प्रवाशाला पकडले. शाहरुख असे त्याचे नाव आहे. त्याने 24 कॅरेटचे 135 ग्रॅमपेक्षा जास्त सोने गिळले होते. रुग्णालयात शौचावाटे सोने बाहेर काढण्यात आले. जप्त केलेल्या सोन्याची अंदाजित किंमत सुमारे 21.89 लाख रुपये आहे. एअर अरेबियाच्या 3एल 111 या विमानाने तो हिंदुस्थानात आला होता. सीमा शुल्कच्या एअर इंटेलिजन्स युनिटने वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याला चौकशीसाठी थांबवले.

ट्रेलरची बोलेरोला धडक, पाच पोलिसांचा मृत्यू

ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिह्यात रविवारी पहाटे एका भरधाव ट्रेलरने पोलिसांच्या बोलेरो वाहनाला धडक दिल्याने पाच पोलीस ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. झारसुगुडा सदर पोलीस स्टेशनजवळ हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की पोलिसांची गाडी चक्काचूर झाली. सब-इन्स्पेक्टर निरंजन कुजूर, एपीआर कर्मचारी काशीराम भोई, एपीआर कर्मचारी देबदत्त सा, एपीआर हवालदार लिंगराज धुरुआ आणि होमगार्ड भक्तबंधू मिर्धा यांचा या अपघातात मृत्यू झाला.

सुनीता विल्यम्सच्या मिशनमध्ये गंभीर त्रुटी

नासाने मान्य केलेय की सुनीता विल्यम्सचे अंतराळात अडकणे धोकादायक होते. नासाने  मिशनच्या या दुर्घटनेला  टाईप ए श्रेणीत ठेवले आहे. या श्रेणीतील दुर्घटना सर्वात गंभीर समजली जाते. चॅलेंजर आणि कोलंबिया शटल दुर्घटनेमध्येही ही श्रेणी वापरण्यात आली होती. कोलंबिया शटल दुर्घटनेत हिंदुस्थानची अंतराळवीर कल्पना चावला यांचा मृत्यू झाला होता. सुनीता विल्यम्स यांच्या मिशनमध्ये गंभीर त्रुटी होत्या, असे सांगणारा 311 पानी अहवाल  नासाच्या प्रशासकाने दिला आहे.

रश्मिकाविजयच्या लग्नाची जोरदार तयारी

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्न करणार आहेत. ते उदयपूरमध्ये विवाहबद्ध होणार आहेत. लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यांच्या लग्नासाठी दिल्लीतील लोकप्रिय बँडशी करार करण्यात आला आहे. दिल्लीतील या बँडने अनेक सेलिब्रेटींच्या लग्नात सहभाग घेतला आहे. विवाहसोहळा आयटीसी मोमेंटोस येथे होईल.

Comments are closed.