भारतात जन्मलेला चित्ता वयाचा आहे
वन्य प्राणीप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘चित्ता’ या चित्तवेधक वन्य प्राण्याची भारतात पुनर्स्थापना करण्याचा भारताचा प्रकल्प यशस्वी होण्यास प्रारंभ झाला आहे. भारताने नामबिया या आफ्रिकेतील देशातून चित्ते आणून त्यांना मध्यप्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडले आहे. या चित्त्यांपासून भारतातच आता चित्त्यांची उत्पत्ती होऊ लागली आहे. याचा अर्थ विदेशील हे चित्ते आता भारतात स्थिरावले आहेत, असा होत आहे. अशा प्रकारे भारतात जन्माला आलेला ‘मुखी’ नामक चित्ता गेल्या सोमवारी, वयात आला आहे, अशी घोषणा कुनो अभयारण्याच्या व्यवस्थापनाने केली आहे. ही घटना जशी भारतातील वन्य प्राणीप्रेमींसाठी समाधानाची आहे, तशीच भारताच्या वन्यजीव व्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्वाची आहे, असे मत अनेक प्राणीतज्ञांनी व्यक्त केले.
17 सप्टेंबर 2022 या दिवशी भारताने नामिबियातून आणलेले 8 चित्ते मध्यप्रदेशातील ‘कुनो’ अभयारण्यातील संरक्षित क्षेत्रात सोडले होते. या चित्त्यांमध्ये नर आणि माद्या यांचा समावेश होता. या चित्ते या अभयारण्यात स्थिरस्थावर होण्यासाठी काही वेळ जावा लागला. त्यानंतर या चित्त्यांना पिले होऊ लागली आहेत. आतापर्यंत या चित्ता प्रकल्पाच्या अंतर्गत चित्त्यांच्या 26 बछड्यांचा जन्म झालेला आहे. तथापि, त्यांच्यापैकी 19 बछड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही चित्तेही मृत्युमुखी पडले आहेत. तथापि, आता हे चित्ते भारतीय हवामानाला सरावले असून नव्याने जन्माला आलेल्या बछड्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ लागली आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
भारतातील चित्ता नामशेष
पूर्वी भारताही भारतीय चित्त्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते. भारतीय चित्ता हा आफ्रिकन चित्त्यापेक्षा वेगळा होता. मात्र, राजेमहाराजांचा चित्ते पाळण्याचा शोक आणि चित्त्यांची अनिर्बंध शिकार यामुळे भारताच्या वन्य भागातील चित्ते हळूहळू कमी होत गेले. पाळीव चित्त्यांना पिले होत नसल्याने त्यांचीही संख्या कमी होत गेली. अशा प्रकारे भारतातून 1940 मध्ये भारतीय चित्ता हा वैशिष्ट्यापूर्ण प्राणी नामशेष झाला. त्यानंतरची अनेक दशके चित्त्याचे दर्शन भारतीयांना झाले नाही. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आफ्रिकेतून चित्ते भारतात आणून त्यांना येथे वसविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आणखी साधारणत: सहा वर्षे लागतील, असे तज्ञांचे मत आहे.
Comments are closed.