IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सच्या सलग तिसऱ्या पराभवाला कोण जबाबदार! 18 कोटींच्या खेळाडूच्या फ्लॉप कामगिरीमुळे संघाचं नुकसान?
आयपीएल (IPL) 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) प्रवास आतापर्यंत अत्यंत निराशाजनक राहिला आहे. संघाने या हंगामात आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईच्या या कामगिरीमुळे त्यांचे चाहते खूप नाराज आहेत. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नईने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे, परंतु गेल्या दोन हंगामामधील त्यांची खेळण्याची पद्धत पाहता संघ जणू विजय मिळवणे विसरला आहे की काय, असे वाटू लागले आहे.
आयपीएल 2026 मधील खराब कामगिरीसाठी चाहते प्रशांत वीर, आयुष म्हात्रे आणि कार्तिक शर्मा यांसारख्या खेळाडूंना जबाबदार धरत आहेत. मात्र, ज्या खेळाडूवर संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना सर्वाधिक विश्वास होता, तो म्हणजे स्वतः कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad). चेन्नईने या हंगामासाठी ऋतुराजला 18 कोटी रुपयांना रिटेन केले होते. त्याला त्याला कर्णधारपदही सोपवण्यात आले, पण या हंगामामध्ये तो ना फलंदाजीत मोठी खेळी करू शकला, ना त्याच्या नेतृत्वाची झलक दिसली. त्याच्या या खराब फॉर्मने संघाची डोकेदुखी वाढवली आहे.
ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंतच्या तीन सामन्यांत केवळ 13.66 च्या सरासरीने 41 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 28 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. गेल्या हंगामात (IPL 2025) देखील दुखापतीमुळे त्याला अर्ध्यातूनच बाहेर पडावे लागले होते. तेव्हा त्याने 5 सामन्यांत 24.40 च्या सरासरीने 122 धावा केल्या होत्या. तसेच आता चेन्नईला जर या हंगामात विजयाच्या मार्गावर परतायचे असेल, तर ऋतुराजला केवळ धावाच कराव्या लागणार नाहीत, तर कर्णधार म्हणूनही अधिक चांगली रणनीती आखावी लागेल.
5 एप्रिल रोजी आरसीबीविरुद्ध मिळालेला पराभव हा चेन्नईचा या हंगामातील सलग तिसरा पराभव होता. त्याआधी त्यांना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सकडूनही हार पत्करावी लागली होती. सलग तीन पराभवांमुळे चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग आता खडतर झाला आहे. आता 11 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात चेन्नईचा संघ कशी पुनरागमन करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.