IPL 2027: आयपीएल 2027 पूर्वी सीएसकेचा मोठा निर्णय! मुख्य प्रशिक्षक म्हणून झहीर खान यांच्यावर सोपवली जबाबदारी

आगामी काळात इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league) म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धेचा 20 वा हंगाम 2027 मध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्स (CSK) म्हणजेच सीएसकेने मोठी घोषणा केली आहे. CSKने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Jaheer Khan) यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये चेन्नईला सहावे विजेतेपद मिळवून देण्याचा झहीर खान यांचा प्रयत्न असेल. झहीर खान यांच्याकडे आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव आहे. नुकतेच ते कॅनडातील व्हँकुव्हर एंकर्स संघाशीही जोडले गेले होते.

2017 मध्ये खेळाडू म्हणून आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर झहीर खान यांनी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम केले आहे. आपल्या आयपीएल कारकिर्दीत ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचा भाग होते. त्यानंतर 2019 च्या आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सने त्यांची क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक म्हणून नियुक्ती केली. पुढे त्यांनी संघाच्या ग्लोबल डेव्हलपमेंट प्रमुखाची जबाबदारीही सांभाळली. झहीर नुकतेच लखनऊ सुपर जायंट्ससोबतही जोडले गेले होते.

IPL 2025 साठी त्यांची संघाच्या मेंटरपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पुढील हंगामापूर्वी त्यांनी या फ्रँचायझीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. चेन्नईमध्ये झहीर खान आता स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी काम पाहताना दिसणार आहेत. फ्लेमिंग यांनी 2009 ते 2026 या काळात जवळपास 18 वर्षे चेन्नईच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. गेल्या काही वर्षांत चेन्नई सुपर किंग्सच्या यशात फ्लेमिंग यांची महत्त्वाची भूमिका होती. आता फ्रँचायझीसोबतचा त्यांचा दीर्घकाळाचा प्रवास संपला आहे. त्यांनी इंग्लंड क्रिकेट संघासोबत नवी जबाबदारी स्वीकारली असून, जुलैमध्ये त्यांची इंग्लंड पुरुष कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

चेन्नईचे प्रशिक्षक बनणे हा झहीर खान यांच्या प्रशिक्षक कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. खेळाडू म्हणून झहीर खान यांनी आयपीएलमध्ये 100 सामने खेळले असून 27.27 च्या सरासरीने 102 विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही शानदार राहिली. तिन्ही प्रकारांमध्ये त्यांनी एकूण 610 विकेट घेतल्या.

CSKसोबत जोडल्यानंतर झहीर यांनी सांगितले की, या फ्रँचायझीचा भाग होणे त्यांच्यासाठी सन्मानाची बाब आहे. खेळाडू म्हणून त्यांनी चेन्नईविरुद्धचे सामने खेळण्याचा खूप आनंद घेतला, असे त्यांनी सांगितले. चेपॉकमध्ये सुपरफॅन्सकडून निर्माण होणारे वातावरणही त्यांनी खास असल्याचे म्हटले. एवढा समृद्ध इतिहास असलेल्या या फ्रँचायझीच्या वारशाचा भाग होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही झहीर यांनी सांगितले.

संघाच्या मालकीण रूपा गुरुनाथ यांनी झहीर यांचे संघात स्वागत केले. त्या म्हणाल्या, “झहीर खान हे चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक असतील, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. झहीर यांची शानदार क्रिकेट कारकीर्द आणि युवा खेळाडूंमधील प्रतिभा विकसित करण्याची त्यांची क्षमता यामुळे ते आमच्या संघासाठी महत्त्वाचे सदस्य ठरतील. त्यांच्या मार्गदर्शनामुळे या फ्रँचायझीची मजबूत पायाभरणी आणखी मजबूत होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

Comments are closed.