चेन्नई सुपर किंग्स की मुंबई इंडियन्स, कोणाचे पारडे जड? इरफान पठानने दिली प्रतिक्रिया

भारतीय संघाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाण याच्या मते, इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील ‘सर्वश्रेष्ठ टीम’ कोण? या वादात मुंबई इंडियन्सचे पारडे चेन्नई सुपर किंग्सपेक्षा जड आहे. त्याने म्हटले आहे की, मुंबईच्या संघाने भारतीय क्रिकेटला अनेक ‘मॅच-विनर’ खेळाडू दिले आहेत.

​पठानने ‘जिओस्टार’शी बोलताना सांगितले की, “आयपीएलमधील सर्वोत्तम संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यापैकी एकाची निवड करणे हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. चेन्नईने २०१० पासून आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी २०१० आणि २०११ मध्ये सलग दोनदा जेतेपद पटकावले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ ठरला. मात्र, जेव्हा मुंबई इंडियन्सने २०१३ पासून विजयाची मालिका सुरू केली, तेव्हा त्यांनी दर दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. त्यानंतर त्यांनी २०१९ आणि २०२० मध्ये सलग दोनदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली.”

​इरफान पठान पुढे म्हणाला की, मुंबई इंडियन्सने भारतीय क्रिकेटला अनेक मॅच-विनर दिले आहेत. तो म्हणाला, “मुंबई इंडियन्सबद्दल मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचे भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचे योगदान. त्यांनी भारतीय संघाला जितके मॅच-विनर खेळाडू दिले आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. तुम्ही हे कसे करू शकता? पहिले म्हणजे, तुम्ही तुमची फ्रँचायझी मोठी बनवता. दुसरे म्हणजे, तुमच्याकडे जो संघ आहे त्यासह तुम्ही उत्कृष्ट निकाल देता. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडे एक जबरदस्त संघ होता, जो सहज ट्रॉफी जिंकू शकला असता; पण वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.”

​पठानने शेवटी नमूद केले की, “चेन्नई सुपर किंग्सकडे ४ भारतीय कर्णधार नाहीत, जे मुंबई इंडियन्सकडे आहेत. या दृष्टिकोनातून – म्हणजेच एक संघ तयार करणे आणि एखाद्या मोठ्या ध्येयासाठी योगदान देणे या बाबतीत मला वाटते की मुंबई इंडियन्स हाच आयपीएलमधील सर्वोत्तम संघ आहे. मला माहित आहे की चेन्नई सुपर किंग्स नेहमीच असा दावा करेल की ते सुद्धा सर्वोत्तम आहेत, कारण त्यांनीही ५ ट्रॉफी जिंकल्या आहेत. यात शंकाच नाही. हा वाद नेहमीच सुरू राहील आणि तो एक रास्त वाद आहे. मात्र, मला वाटते की मुंबई इंडियन्सचे पारडे यासाठी जड आहे, कारण त्यांनी भारतीय क्रिकेटला इतके शानदार क्रिकेटपटू आणि तरुण गुणवत्ता दिली आहे.”

Comments are closed.