चेन्नईला चेपॉकवरही शॉक, पंजाबच्या किंग्जनी चेन्नईच्या किंग्जला हरवले
गेल्या मोसमात साखळीत पराभवांचे दशक सहन करणाऱया आयपीएल किंग्ज चेन्नईच्या संघाला श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जने पाच विकेट्सनी धूळ चारली. विशेष म्हणजे चेन्नईचे 210 धावांचे द्विशतकी आव्हान पंजाबने आठ चेंडू आधीच गाठत सलग दुसरा विजय नोंदवला. आपल्या 39 धावांच्या खेळीतील 36 धावा चौकार-षटकारांनी काढणारा प्रियांश आर्य ‘सामनावीर’ ठरला.
यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या दोन सामन्यांत 200 पेक्षा अधिक धावांचे आव्हान सहज गाठले गेले होते. त्यामुळे यावेळी यशस्वी पाठलागाची सीरिज गाजणार, हे स्पष्ट होते. त्यानुसार चेन्नईच्या 210 धावांच्या आव्हानातली हवा प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांच्यातील 61 धावांची झंझावाती भागीने कमी केली. प्रियांशने आपल्या 11 चेंडूंच्या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार खेचत 38 धावा ठोकल्या. प्रभसिमरनने 43 धावा फटकावल्या. त्यानंतर कूपर कोनोलीनेही (43) आपल्या बॅटची कमाल दाखवली. आघाडीचे तिन्ही फलंदाज बाद झाल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरने नेहाल वढेराला सोबत घेत 59 धावांची भागी करून संघाचा विजय जवळजवळ निश्चित केला. अय्यरने 29 चेंडूंत 50 धावा करत संघाला विजयपथावर नेले.
त्याआधी संजू सॅमसनच्या 7 धावांच्या अपयशी खेळीनंतर आयुष म्हात्रेने आपल्या बॅटची कमाल दाखवताना कर्णधार ऋतुराज गायकवाडसह (28) 96 धावांची भागी रचली. मग शिवम दुबेने सरफराज खानसह (32) पाचव्या विकेटसाठी 38 धावांची भर घातली. तसेच शेवटच्या तीन षटकांत 41 धावा चोपत शिवमने चेन्नईला 209 धावांपर्यंत पोहोचवले. शिवमने 27 चेंडूंत नाबाद 47 धावा ठोकल्या.
Comments are closed.