चेन्नईचा सलग तिसरा पराभव! आता कमबॅक कसं करणार? 'हे' 3 बदल ठरू शकतात गेमचेंजर

चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल २०२६ ची मोहीम आतापर्यंत फारशी चांगली राहिलेली नाही. संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता चेन्नईसाठी येथून प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण वाटत आहे. सध्या CSK च्या चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, येथून संघाचे पुनरागमन कसे होणार? चेन्नई सुपर किंग्सला वापसी करण्यासाठी नक्की काय करावे लागेल? तर, चेन्नईचा संघ कोणते तीन बदल करून आगामी सामन्यांमध्ये दमदार पुनरागमन करू शकतो, ते आपण पाहूया.

​चेन्नईला जर आगामी सामन्यांमध्ये पुनरागमन करायचे असेल, तर त्यांना आपल्या गोलंदाजी विभागात सुधारणा करण्याची गरज आहे. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये चेन्नईच्या संघाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पॉवरप्लेमध्येही चेन्नईची स्थिती फारशी चांगली नाही. चेन्नईला अशा गोलंदाजाची गरज आहे जो चांगल्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करू शकेल. चेन्नईच्या संघात जॅकरी फॉल्क्स आणि अकील हुसेन सारखे गोलंदाज उपलब्ध आहेत, जे डेथ ओव्हर्स आणि पॉवरप्लेमध्ये प्रभावी ठरू शकतात. परंतु CSK ने आतापर्यंत त्यांना संधी दिलेली नाही. अकिल होसेनला टी२० मधील २७३ सामन्यांचा अनुभव असून त्याने आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये २५४ विकेट्स घेतल्या आहेत. होसेन प्रामुख्याने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करतो आणि त्याचा इकॉनॉमी रेट केवळ ७.१ इतका आहे.

​चेन्नई सुपर किंग्सच्या मिडल ऑर्डरमध्ये असे २ खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच आयपीएल खेळत आहेत. कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर या दोघांना सीएसकेने १४.२ कोटींच्या भरमसाठ किमतीत खरेदी केले होते. सुरुवातीच्या तीन सामन्यांत या दोन्ही फलंदाजांना संधी मिळाली, परंतु त्यांची कामगिरी अपेक्षेनुसार झालेली नाही. हे दोन्ही फलंदाज प्रतिभावान आहेत, पण आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत कोणताही संघ मिडल ऑर्डरमध्ये दोन नवीन खेळाडूंवर अवलंबून राहू शकत नाही. अशा परिस्थितीत CSK ला अशा खेळाडूला संधी देण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये मिडल ऑर्डरमध्ये सामना फिरवण्याची ताकद आहे आणि तो खेळाडू म्हणजे dewald brevis. ब्रेविसकडून चेन्नईला मोठ्या अपेक्षा आहेत, पण दुखापतीमुळे तो आतापर्यंत खेळू शकलेला नाही. चेन्नईच्या संघाला ब्रेविसची नितांत गरज आहे. तो लवकरात लवकर फिट व्हावा, अशी फ्रेंचाइजीची इच्छा असेल.

​चेन्नई सुपर किंग्सची टॉप ऑर्डर आतापर्यंत फ्लॉप ठरली आहे. तीन सामन्यांत संघाचे सलामीवीर संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांची बॅट तळपलेली नाही. अशा स्थितीत संघ आपल्या ओपनिंग कॉम्बिनेशनमध्ये बदल करू शकतो. आयुष म्हात्रेज्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकले होते, त्याने आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. परंतु पुढच्या सामन्यात त्याला सलामीवीर म्हणून आजमावले जाऊ शकते. त्याचबरोबर संजू किंवा ऋतुराज यांपैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते किंवा उर्विल पटेल यालाही आगामी सामन्यांमध्ये संधी दिली जाऊ शकते. आता पुढच्या सामन्यात चेन्नईचा संघ किती बदल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments are closed.