100 कसोटी खेळलो, तरी… भारतीय संघातून बाहेर काढल्याबद्दल स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य!

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) बऱ्याच काळापासून कसोटी संघाबाहेर आहे. त्याला संघात सतत दुर्लक्षित केले जात आहे आणि त्याऐवजी युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. पुजाराच्या सतत दुर्लक्षामुळे, अशी अटकळ बांधली जात आहे की संघ आता त्याच्यापासून दूर गेला आहे आणि त्याला संधी मिळणार नाही. पण, पुजाराने अजूनही पुनरागमनाची आशा सोडलेली नाही आणि संघातून वगळल्याबद्दल त्याने आपले मौन तोडले आहे.

चेतेश्वर पुजाराबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 103 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने 176 डावांमध्ये 7,195 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 19 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली आहेत. पुजाराने कारकिर्दीत 3 द्विशतके देखील झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 206 राहिली आहे. पुजाराने जून 2023 मध्ये त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

पुजाराने अजूनही भारतीय संघात परतण्याची आशा सोडलेली नाही. त्याच्या मते, तो सतत कठोर परिश्रम करून पुनरागमन करू शकतो. रेव्हस्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान पुजारा म्हणाला, जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे यशस्वी होते आणि 100 हून अधिक कसोटी सामने खेळूनही त्याला संधी मिळत नाही, तेव्हा तुम्हाला सतत कठोर परिश्रम करत राहावे लागते. यशस्वी होण्याचा हा मूळ मंत्र आहे. संघात संधी न मिळणे हे खूपच निराशाजनक आहे, परंतु खेळावरील माझे प्रेम पाहता, मी स्वतःला तयार आणि प्रेरित ठेवले आहे. खेळावरील माझ्या प्रेमामुळेच मी स्वतःला खेळाच्या खूप जवळ ठेवतो.”

चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी चांगली नव्हती. संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागला. आता काही दिवसांत इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची निवड होणार आहे आणि पुजारा पुनरागमन करू शकतो की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Comments are closed.