काळजाचा ठोका चुकला… अपघात टळला; भुजबळांचे हेलिकॉप्टर मैदानात उतरले
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने जात होते. यावेळी पायलटकडून मोठी चूक झाली. हेलिपॅडऐवजी कार पार्किंगच्या जागेत हेलिकॉप्टर उतरविले. सुदैवाने अपघात टळला; मात्र या घटनेने क्षणभर काळजाचा ठोका चुकला. या घटनेतून छगन भुजबळ थोडक्यात बचावले. ते सुखरूप असून, त्यांनी नियोजित कार्यक्रम पूर्ण केला.
महात्मा फुले यांचे गाव असलेल्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे जिल्हा परिषदेच्या ज्योती सावित्री आंतरराष्ट्रीय शाळेच्या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने छगन भुजबळ जात असताना लॅण्डिंगदरम्यान मोठी चूक झाल्याची धक्कादायक घटना घडली. लॅण्डिंगदरम्यान वैमानिकाला हेलिपॅड दिसेनासे झाले आणि ‘ब्राउन आउट’ या स्थितीमुळे दृश्यमानता अचानक कमी झाली. हेलिकॉप्टरच्या रोटरमुळे उडालेल्या धुळीमुळे आणि कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या या परिस्थितीत वैमानिकाला अचूक लॉण्डंग करणे कठीण झाले. नियोजित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगसाठी राखीव असलेल्या मैदानात उतरवण्याचे सांगण्यात आले.
मोकळी जागा… पांढरे पट्टे
खानवडी गावातील कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होता; परंतु हेलिकॉप्टरच्या पायलटला कार पार्किंगमधील मोकळी जागा हेच हेलिपॅड असल्याचे वाटले. या जागेत पांढरे पट्टे आखण्यात आले होते. त्या मोकळ्या जागेतच पायलटने हेलिकॉप्टर उतरवले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पार्किंगमध्ये काही वाहने उभी असली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात धूळ उडाली. पोलिसांनी पायलटला योग्य माहिती दिल्यानंतर हेलिकॉप्टर तिथून हलवण्यात आले. या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. योग्य नियोजन असतानाही चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवल्याने नागरिकांनी भीती व्यक्त केली.
हेलिकॉप्टर घटनेबाबत मुख्यमंत्र्यांकडून चौकशीची घोषणा
खानवडीमधील मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी कार पार्किंगमध्ये लॅण्ड करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दरम्यान, याप्रकरणी एटीसीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
काळजीचे कारण नाही – भुजबळ
आमच्या पायलटला हेलिपॅड सापडले नाही. त्यामुळे कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरले. अपघात वगैरे काही नाही. काही काळजीचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
छगन भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला, पण म्हणून शासनानेही एवढ हलगर्जीपणा करणे योग्य नाही. – आमदार, रोहित पवान
Comments are closed.