गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
गॅस टंचाईवर छगन भुजबळ : राज्यात घरगुती गॅस अर्थात एलपीजी तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उतारा काढण्यासाठी आता राज्य सरकारकडून बाजारपेठेत मोठ्याप्रमाणावर केरोसिन (Kerosene) आणण्याची योजना आखण्यात आली आहे. जेणेकरुन सामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर (Gas Cylinder) न मिळाल्यास केरोसिनचा वापर करता येईल. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात निवेदन मांडले. (Maharashtra Gas Shortage)
छगन भुजबळ यांनी राज्यातील गॅस टंचाईबाबत भाष्य करताना म्हटले की, मी बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकाळी चर्चा केली. त्यांनी राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन 9000 वरुन 11000 मेट्रिक टनपर्यंत वाढवल्याचे सांगितले. तसेच एलपीजी उत्पादनातील सगळ्या अडचणी दूर करण्याचे काम सुरु असल्याचे या कंपन्यांकडून सांगण्यात आले. सध्याच्या गॅस टंचाईतून मार्ग काढण्यासाठी घरगुती गॅसच्या उत्पादनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यानंतर गॅस उरलाच तर रुग्णालये, शैक्षणिक संस्था,वृद्धाश्रम, स्मशानभूमी यांना एलपीजी उत्पादनात 100 टक्के प्राधान्य दिले जाईल. औषध उद्योगासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील उपहारगृहांना एलपीजी वितरणात 50 टक्के प्राधान्य आहे, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी छगन भुजबळ यांनी केरोसिनच्या वापराबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आपल्याकडे राज्यात केरोसिनचा भरपूर साठा आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन द्यायची गरज नाही, असे निर्देश मध्यंतरी न्यायालयाने दिले होते. मात्र, आता आम्ही सगळ्यांना केरोसिन उपलब्ध करण्यासंदर्भात न्यायालयाला कळवले आहे. त्यानुसार केरोसिन डिलर्सही केरोसिन देऊ शकतात. मात्र, मध्यंतरी आपण केरोसिन पूर्णपणे बंद केल्याने केरोसिन डिलर्सची साखळी तुटली होती. त्यामुळे बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपन्यांच्या पंपांवर केरोसिन उपलब्ध करुन देऊ. जेणेकरुन केरोसिनमध्ये भेसळ होणार नाही. आम्ही केंद्र सरकारच्या सातत्याने संपर्कात आहोत. एलपीजी आणि पेट्रोलियम पदार्थ मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. हा प्रश्न हळूहळू सुटेल, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
एलपीजीचा विषय हा केंद्र सरकारचा आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, एलपीजीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. रांगा लावणे, काळाबाजार होणे यावर लक्ष आहे. अधिकार असलेल्या समित्यांची स्थापन करण्यात आली आहे. आतापर्यंत कारवाीत 1208 गॅस सिलेंडर आणि 33 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गॅस सिलेंडरची किंमत एका महिन्यात वाढली आहे. मात्र, एलपीजी उत्पादनही वाढल्याची माहिती छगन भुजबळ यांनी सभागृहात दिली.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.