Chhagan Bhujbal statement on telgi stamp paper scam 2003 in marathi


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाफुटी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तेलगी प्रकरणाची आठवण पुण्यातील एका मुलाखतीत करून दिली. “तेलगी प्रकरणात सीबीआयने माझं नाव घेतलं नव्हतं, तरीदेखील मला राजीनामा द्यावा लागला,” असे विधान त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. “तेलगी प्रकरणात माझे नाव कुठेही नसताना मला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शरद पवारांनी माझा राजीनामा घ्यायची फार घाई केली,” असे विधान त्यांनी यावेळी केले आहे. (Chhagan Bhujbal statement on telgi stamp paper scam 2003)

हेही वाचा : Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपाचा आग्रह का? गिरीश महाजनांनी सांगितलं कारण 

जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेतील दुसऱ्या संसद कट्टामध्ये विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. ते म्हणाले की, “तेलगी प्रकरण तीन राज्यांमध्ये झाले होते. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन विनंती केली की या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा. त्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे दिले. यावेळी मी ट्रकभर कागद, दस्तावेज घेऊन गेलो होतो. त्यामध्ये कुठेही माझे नाव नमूद केलेले नाही. तरीही मला शरद पवार यांनी राजीनामा द्यायला लावला होता. माझ्या माथी एक शिक्का बसला की हा तेलगी प्रकरणामधील आरोपी आहे. शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली. त्यामुळेच हे सगळे घडले.”

शिवसेना का सोडली?

या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेत्यापासून राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. मी जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो.” असे विधान त्यांनी केले. “काँग्रेसमध्ये राहून काम केले असते आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला नसता तर, त्यावेळी मला मुख्यमंत्री होण्याची संधी होती. पण, ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडून दिल्या. मी आजही पद नसताना लढत राहणार.” असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Comments are closed.