‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ (पीसीपीएल) टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
पुणे, १६ मेः पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटने तर्फे आयोजित आणि ऑक्सिरीच पुरस्कृत ‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ (पीसीपीएल) टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्ज आणि विश्व टायगर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला. स्पर्धेचे उद्घाटन माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते करण्यात आले.
हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत विशाल गव्हाणे याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे छत्रपती संभाजी किंग्ज संघाने बंट्स वॉरीयर्सचा १८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्या छत्रपती संभाजी किंग्ज संघाने १४५ धावा धावफलकावर लावल्या. अथर्व भोसले (४१ धावा), अजिंक्य खानदेशे (२४ धावा) आणि विशाल गव्हाणे (२० धावा) यांनी संघाचा डाव बांधला.
बंट्स संघाच्या प्रशांत तेलंगे याने ४ गडी बाद केले. या आव्हानाला उत्तर देताना बंट्स वॉरीयर्सचा डाव १२७ धावांवर मर्यादित राहीला. निनाद सी. याने ३८ धावांची आणि प्रशांत तेलंगे याने २१ धावांची खेळी केली. छत्रपती संभाजी संघाच्या सईश शिंदे याने तीन गडी तर, विशाल गव्हाणे आणि हरीश बाकळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला शानदार विजयी सलामी मिळवून दिली.
दुसर्या सामन्यामध्ये अर्णेश रॉय याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर विश्व टायगर्स संघाने मोरे पाटील पॅकर्स संघाचा ७ धावांनी निसटता पराभव करून विजयी सलामी दिली. विश्व टायगर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. अर्णेश रॉय याने ३४ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना मोरे पाटील पॅकर्स संघाचा डाव ६५ धावांवर मर्यादित राहीला.
याआधी माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, उपाध्यक्ष वसंतभाऊ कोकणे, संघमालक विजय कापसे, रवी शेट्टी, सुदाम मोरे-पाटी, आरती तांबोळी, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे, स्पर्धा समितीचे विजय कोतवाल, प्रदीप वाघ, मुकेश गुजराथी, नरेंद्र कदम, प्रशांत तेलंगे, युसुफ बर्हाणपूरे आदि मान्यवर उपस्थित होते.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीःछत्रपती संभाजी किंग्जः १९.१ षटकात १० गडी बाद १४५ धावा (अथर्व भोसले ४१, अजिंक्य खानदेशे २४, विशाल गव्हाणे २०, प्रशांत तेलंगे ४-२४, सागर जाधव २-८) वि.वि. बंट्स वॉरीयर्सः १९ षटकात १० गडी बाद १२७ धावा (निनाद सी. ३८, प्रशांत तेलंगे २१, सईश शिंदे ३-१४, विशाल गव्हाणे २-१९, हरीश बाकळे २-६, ); सामनावीर विशाल गव्हाणे;
विश्व टायगर्सः १० षटकात ८ गडी बाद ७२ धावा (अर्णेश रॉय ३४, हर्षल हडके १३, सार्थक गायकवाड ३-९, रूद्र भुजबळ १-५, फैयाझ लांडगे १-८) वि.वि. मोरे पाटील पॅकर्सः १० षटकात ५ गडी बाद ६५ धावा (तिलक जाधव ३३, पुलकेश हलामुनी १२, शुभ श्रीवास्तव १२, सचिन सावंत १-७); सामनावीरः अर्णेश रॉय;
Comments are closed.