नशेत झिंगल्या; दोन तरुणींचा भररस्त्यात राडा; एकमेकींना मारहाण, छत्रपती संभाजीनगरमधील घटनेचा VID

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर मध्यरात्री दोन तरुणींनी दारूच्या नशेत राडा घालून मोठा गोंधळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणींनी भररस्त्यात शिवीगाळ करत एकमेकींना मारहाण केली त्याचबरोबर हॉटेलची तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले. जिन्सी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(Chhatrapati Sambhajinagar viral video)

माहितीनुसार, हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास जालना रोडवरील मोंढा नाका येथे घडला. आरती प्रकाश कांबळे (वय 30, रा. उस्मानपुरा, पीर बाजार) आणि प्रतीक्षा बाळासाहेब भादवे (वय 25, रा. उस्मानपुरा, पीर बाजार) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणींची नावे आहेत. दोन्ही तरुणी नशेत आल्यावर रस्त्यावरच एकमेकींना शिवीगाळ करू लागल्या. त्यानंतर जवळच असलेल्या डॉमिनोज पिझ्झाजवळ जाऊन त्यांनी तोडफोड केली. दुकानातील काच फोडण्यात आल्या. त्यानंतर त्या मुख्य रस्त्यावर आल्या आणि पुन्हा एकमेकींना शिवीगाळ व मारहाण सुरू केली. जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, नागरिकांनी कोणताही मोठा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र तरुणींना ताब्यात घेताना त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांनी समजूत काढून दोघींना शांत केले आणि त्यांना घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही तरुणींविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार घोडके करत आहेत. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात टिपला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणामुळे शहरात नशेतून होणाऱ्या अनुचित प्रकारांवरून चर्चांना उधाण आले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.