मैत्रिणीला गोळी मारली, संभाजीनगरचा डॉन ‘तेजा’ला अटक, पोलिसांनाच म्हणाला बाहेर आल्यावर अजून…
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगरात दहशत माजवणारा कुख्यात गुन्हेगार कंज़ल सय्यद एजाज ऊर्फ ‘तेजा’ याला गुन्हे शाखा व सिडको पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री रंगेहाथ पकडले. तेजाविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, बलात्कार, अमली पदार्थ विक्री, शस्त्रसाठा बाळगणे अशा तब्बल 17 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे, अटकेनंतर पंचनाम्यासाठी नेताना तेजाने पोलिसांनाच धमकी देत “बाहेर आल्यावर अजून चार मुलींना मारेन” असे खुलेआम जाहीर करत आव्हान दिले. (Crime News)
नेमकं काय घडलं होतं ?
सय्यद फैजल उर्फ तेजा सय्यद एजाज याने किलेअर्क परिसरात स्वतःच्या मैत्रिणीवरच पिस्तुलातून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 11) रात्री सुमारे 11 वाजता घडली. गोळीबारात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेपूर्वी सोमवारी रात्री आठच्या सुमारास तेजा बेगमपुरा परिसरात बराच वेळ नशेत फिरत स्थानिकांमध्ये दहशत माजवत होता. त्याच्या भीतीपोटी कोणीही विरोध करण्याचे धाडस केले नाही. नंतर तो किलेअर्क परिसरातील मैत्रिणीच्या घरी पोहोचला. तेथे वाद घालत मारहाण केल्यानंतर त्याने पिस्तुल काढून थेट गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर तेजा पळून गेला असला, तरी पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून त्याला बेगमपुरा परिसरातून अटक केली.
सात वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर
2018 साली एमआयडीसी सिडको परिसरात खुनाचा प्रयत्न केल्यापासून तेजा पोलिसांच्या रेकॉर्डवर आला. त्यानंतर शहरातील विविध भागांत लूटमार, विनयभंग, अमली पदार्थांची विक्री, शस्त्र बाळगणे, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग राहिला. 2020 मध्ये बेगमपुरा भागात त्याने मैत्रिणीसह असलेल्या तरुणावर कोयत्याने वार केला. याशिवाय, येरवड्यापासून बेगमपुरा, सिडको, हर्सूलपर्यंत त्याच्या टोळीने दहशत माजवली होती.
जामिनावर सुटल्यानंतर धमक्या
अलीकडेच जामिनावर सुटलेल्या तेजाने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या. सुटल्यानंतर समाजमाध्यमांवर ‘गोली मार के बता’ असे स्टेटस टाकून धमकी दिली. त्यानंतर बेगमपुरा परिसरात त्याच्या स्वागताच्या पार्ट्याही झाल्या. एवढेच नाही, तर थेट घरात घुसून गोळीबार करण्याचाही प्रयत्न त्याने केला.
पोलिसांची धडक कारवाई
सोमवारी रात्री उपनिरिक्षक विशाल बोडसे व संदीप शिंदे यांच्या पथकाने सिडको परिसरात सापळा रचून तेजाला पकडले. पोलिस पाहताच त्याने आई, मेव्हणा आणि साथीदारांसह पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि गुन्ह्याशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.
कोर्टाचा निर्णय
मंगळवारी तेजाला न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडीत 16 ऑगस्टपर्यंत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या अटकेनंतर शहरातील गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी तेजाच्या उघड धमक्यांमुळे पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखा, लष्कर व सिडको पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. पोलिस तपासात या टोळीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Comments are closed.