Chhatrapati Sambhajinagar news – विद्यार्थ्यांची 17 वार करुन निर्घृण हत्या

गुरुगोविंदसिंगपुरा परिसरात रुम करून राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर 17 वार करून निघृण खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री उशीरा उघडकीस आली. याप्रकरणी गुरुगोविंदसिंगपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

देवगिरी महाविद्यालयात बीसीएसचे शिक्षण घेणारा प्रदीप विश्वनाथ निपटे (वय – 19, रा. ह.मु. म्हाडा कॉलनी, मुळगाव पिंपरखेड, वडवणी, जि. बीड) असे खून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. गुरुगोविंदसिंगपुरा परिसरातील भाजीवालीबाई पुतळ्याजवळ म्हाडा कॉलनी येथे सहा महिन्यापूर्वी तो नातेवाईक अमर शिंदे, अर्जुन कवचट आणि अन्य दोन रुम पार्टनर यांच्यासोबत राहत होता.

त्याचा रुमपार्टनर अमर शिंदे याने सांगितले की, मकरसंक्रांतीची सुट्टी असल्याने सर्वजण रुमवर होतो. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अमर हा रीडिंगसाठी निघाला. तेव्हा प्रदीप हा रुममध्ये अंथरुणावर मोबाइल पाहत होता. त्याचे रुमपार्टनर हे रीडिंगला गेले होते. त्यातील अमर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रुमवर परत आला असता, प्रदीप हा तोंडावर ब्लॅकेट घेऊन झोपला होता.

अमरने त्याला उठवले नाही. थोड्यावेळाने रुमपार्टनर अभिषेक लव्हाळे, महेश चव्हाण आणि अर्जुन कवचट हे तिघे रुमवर आले. त्यानंतर जेवणासाठी म्हणून प्रदीपला उठवण्यासाठी त्याच्या अंगावरील ब्लँकेट काढले असता, तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांच्या तोंडावर, हातावर व मानेवर तीक्ष्ण हत्याराने सुमारे 17 वार केलेले होते. ही माहिती रुमपार्टनरने तात्काळ पोलिसांना दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी तसेच प्रदीपच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी विश्वनाथ निपटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुगोविंदसिंगपुरा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे हे करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांची चौकशी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक येरमे यांनी दिली.

Comments are closed.