जिल्हा परिषदेत भाजप-शिंदे गटाला शिवसेना पाठिंबा देणार नाही! – अंबादास दानवे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अत्यंत तोकडी साधने असतानाही शिवसेनेने चांगले यश मिळवले आहे. जिल्हा परिषदेचे ९ सदस्य, तर पंचायत समितीचे ११ सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणारी असली तरी जिल्हा परिषदेत भाजप आणि शिंदेगटाला पाठिंबा दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

मातृभूमी प्रतिष्ठान संपर्क कार्यालयात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या शिलेदारांची आज बैठक घेतली. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी अत्यंत तोकडी साधने असतानाही चांगल्या जागा जिंकल्या. सिल्लोड वगळता इतर सर्व तालुक्यात शिवसेनेला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करताना शिवसेनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असून निर्णायक संख्या आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे सदस्य भाजप-शिंदेगटाला पाठिंबा देणार नाहीत, त्यांचा पाठिंबा घेणार नाहीत, असे दानवे यांनी स्पष्ट केले. पक्ष सोडून कुणी वैयक्तिक पाठिंबा दिला तर तो घेतला जाईल.

बी अॅण्ड सीच्या मुख्य अभियंत्याचे सदस्यांना फोन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा पुतण्या जिल्हा परिषदेत निवडून आला आहे. त्याला अध्यक्ष करण्यासाठी मुख्य अभियंता हे प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना वैयक्तिक फोन करून त्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी शासकीय नोकरी सोडून राजकारणात यावे, असा टोला दानवे यांनी लगावला. शिवसेना सगळ्यांना एकत्र घेऊन सत्तेत येऊ शकते. राजकीय कारणास्तव शिवसेनेला काही लोक पाठिंबा देऊ शकतात.

मनपाच्या टँकरचे ऑडिट करा

महापालिकेने शहरातील अनेक वसाहतींना टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू केला आहे. हे टँकर खासगी कंत्राटदारांचे असून आरटीओकडून त्याची तपासणी करून घेतलेली नाही. मनपाकडे टँकरची कुठलीही नोंद नाही. अधिकारी, कर्मचारी देखील टँकरच्या कंत्राटदारांना पाठीशी घालतात. या टँकरचे ऑडिट करावे, अशी मागणी दानवे यांनी केली.

Comments are closed.