घाटी रुग्णालयात जादूचा प्रयोग… एकाच रुग्णाचे दोन रक्तगट !

घाटी रुग्णालय म्हणजे अजायबघरच ! येथे नित्य नवीन जादूचे प्रयोग होत असतात. आता एकाच रुग्णाचे दोन रक्तगट असल्याचा प्रयोग घाटीने केला आहे. चिठ्ठी देणारे तेच, तपासणारे तेच आणि कारवाई करणारेही तेच. त्यामुळे तेरी भी चूप… मेरी भी चूप असा हा प्रकार ! वडगाव कोल्हाटी येथील येडू मनाळ (७५) यांना मंगळवारी आजारी असल्यामुळे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्ताची कमी असल्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रक्त तपासले आणि चिठ्ठी देऊन घाटीतीलच रक्तपेढीतून रक्तपिशवी आणण्यास सांगितले. चिठ्ठीवर मनाळ यांचा रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ लिहिलेला होता. मात्र रक्तपेढीत त्या गटाचे रक्त उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मनाळ यांच्या नातलगांनी चिठ्ठी आणि रक्तनमुना घेऊन लायन्स ब्लड सेंटर गाठले. तेथे रक्ताचा नमुना तपासला असता रक्तगट ‘ओ पॉझिटिव्ह’ असल्याचे स्पष्ट झाले. रक्तगटच बदलल्याने लायन्स ब्लड सेंटरने चिठ्ठी बदलून देईपर्यंत रक्तपिशवी देण्यास नकार दिला.
मनाळ यांचे नातलग पुन्हा घाटी रुग्णालयाच्या रक्तपेढीत आले. तेथे पुन्हा रक्तगट तपासण्यात आला. तेव्हा रक्तगट ‘ओ पॉझिटिव्ह’च असल्याचे स्पष्ट झाले. मग अगोदर केलेली तपासणी आंधळेपणाने केली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार रुग्णाच्या जीवाशी खेळ करणार असल्याचा आरोप करत सोमनाथ मनाळ यांनी या प्रकरणी घाटी अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. घाटीचे शिस्तप्रिय अधीक्षक रक्तगट बदल प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.