मला राग येतोय… ‘लबाडांनो, पाणी द्या!’ शहरातील महिलांचा शासन-प्रशासनावर संताप
मला राग येतोय… ‘लबाडांनो, पाणी द्या!’ असे म्हणत छत्रपती संभाजीनगर शहरातील पहाडसिंगपुरा आणि भावसिंगपुरा येथील महिलांनी शासन आणि प्रशासनावर पाणी प्रश्नाच्या समस्येवरून आपला राग, संताप व आक्रोश व्यक्त केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या ‘लबाडांनो, पाणी द्या!’ या जनआंदोलनाअंतर्गत पहाडसिंगपुरा आणि भावसिंगपुरा या दोन ठिकाणी आज 3 मे रोजी ‘मला राग येतोय…’ आंदोलन करण्यात आले.
‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी समस्येवरून स्थिती निर्माण झाली आहे. पहाडसिंगपुरा आणि भावसिंगपुरा परिसरात खूपच कमी पाणी येते. दहा दिवसानंतर नळाला पाणी आले तरीही अर्धा तासच आणि तेही कमी दाबाने पाणी येते. नवीन पाईपलाईन टाकली असली तरीही प्रेशरने पाणी येत नाही. पाण्याची वेळ नाही. रात्री-अपरात्री केव्हाही पाणी येते. किमान दोन तास तरी पाणी द्या पाण्याची वेळ निश्चित करा, असा टाहो आंदोलनकर्त्या महिलांनी फोडला.
या भागात 12 ते 13 दिवसाला पाणी येत असल्याने खरंच खूप भयंकर राग येतोय. सर्वसामान्य नागरिकांकडे पाण्याचे टँकर विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. पाणी प्रश्नामुळे महिला हताश झाल्या असून, हा प्रश्न सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. पाण्यावाचून मरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. किमान ४ दिवसाला तरी पाणी द्या, अशी केविलवाणी मागणी माता-भगिनी यांनी केली.
पहाडसिंगपुरा व भावसिंगपुरा परिसरातील साईनगर, संभाजीचौक, प्रभातनगर, गोल्डन सिटी येथे मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. माता-भगिनी यांच्या व्यथा ऐकून माझेपण मन व्याकुळ झाले असून डोकं सुन्न झालं आहे. मनपा प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
याप्रसंगी शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, उपशहरप्रमुख गणेश लोखंडे, सुरेश पवार, योगेश पवार, विलास संबारे, प्रमोद मोरे, योगेश पवार, बाळासाहेब खेत्रे, गणेश जोबळे, ताराचंद कुंडारे, वैभव लकडे, इंदर फत्तेलष्कर, संतोष चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, माजी नगरसेविका मनीषा लोखंडे, अनिता लगड उपस्थित होते.
Comments are closed.