कोंबडी वडे, बांगडय़ाचं तिखलं, तळलेले पापलेट; गोरेगावात रौप्यमहोत्सवी मालवणी जत्रोत्सव

कोंबडी वडे, बांगडय़ाचं तिखलं, तळलेलं पापलेट अशा चमचमीत अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद सोबतीला लावणी, पौराणिक दशावतार अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी नववर्षात मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. निमित्त आहे ते गोरेगाव पश्चिम येथील बेस्ट नगर कला व क्रीडा मंडळातर्फे आयोजित रौप्यमहोत्सवी मालवणी जत्रोत्सवाचे. यंदाही 9 ते 18 जानेवारी या दहा दिवसांच्या कालावधीत जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
बेस्ट नगरमधील या जत्रोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे कोकणातील उद्योजकांना प्राधान्य देण्यात येते आणि फक्त मालवणी स्टॉलधारकांना स्टॉल देण्यात येतात. चायनीज, वडापाव, भेलपुरी असे पदार्थ कधीही ठेवण्यात आलेले नाहीत. संपूर्ण दहा दिवस या जत्रांमध्ये मालवणी दशावतार, नृत्य स्पर्धा, लहान मुलांचे कार्यक्रम, मराठी-हिंदी ऑर्केस्ट्रा, लावणी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अनेक राजकारणी, सेलिब्रेटीदेखील न चुकता या जत्रोत्सवाला हजेरी लावतात. मालवणी जत्रेचा यंदा रौप्यमहोत्सव असल्याने भव्यदिव्य स्वरूपात जत्रा साजरी केली जाणार आहे. तरी नागरिकांनी मोठय़ा संख्येने या जत्रोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजक राजू राजपूत यांनी केले आहे.

Comments are closed.