विधेयकातील हिंदी शब्द पाहून चिदंबरम संतापले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विधेयकांच्या शीर्षकांमध्ये हिंदी शब्दांच्या वापराच्या सरकारच्या ‘वाढत्या प्रवृत्ती’वर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कठोर टीका केली आहे. तसेच हा बदल बिगरहिंदी भाषिक लोकांसाठी ‘अपमानास्पद’ असल्याचा आरोप केला आहे. बिगरहिंदी भाषिक लोक हिंदी शब्दांनी युक्त शीर्षक असलेल्या विधेयक/अधिनियमांना ओळखू शकत नाहीत तसेच ते या शब्दांचा उच्चारही करू शकत नसल्याचा दावा चिदंबरम यांनी केला आहे.

संसदेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकांच्या शीर्षकांमध्ये सरकारकडून हिंदी शब्दांना इंग्रजी अक्षरांना लिहिण्याच्या वाढत्या प्रकाराला मी विरोध करतो. विधेयकाच्या इंग्रजी आवृत्तीत शीर्षक इंग्रजी शब्द तर हिंदी आवृत्तीत हिंदी शब्दांचा वापर करण्याची प्रथा आतापर्यंत होती असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.

75 वर्षांपासून या प्रथेबद्दल कुणाला समस्या झाली नाही तर मग सरकारने हा बदल का केला? हा बदल बिगरहिंदी भाषिक लोक आणि अधिकृत भाषा हिंदी नसलेल्या राज्यांचा अपमान आहे. इंग्रजी एक सहयोगी अधिकृत भाषा म्हणून कायम राहिल असे यापूर्वीच्या सरकारांनी सातत्याने अधोरेखित केले आहे. परंतु हे आश्वासन आता मोडण्याच्या वाटेवर असल्याची मला भीती असल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदाराने केले आहे.

Comments are closed.