मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील खानपान सेवा, पुरवठादारावर पुन्हा ‘छत्रछाया’

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चमचमीत वडा, झणझणीत मिसळ, मटण, चिकन बिर्याणी, गरमगरम चहा, कॉफी आणि स्वीट डिश पुरवण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या खानपान सेवा पुरवठादारावर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पुन्हा एकदा कृपादृष्टी केली आहे. सुखसागर हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस आणि छत्रधारी कॅटरर्सला पुढील वर्षापर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यात बैठकांसाठी येणारे अधिकारी आणि व्हिजिटर्सना खानपान सेवा पुरवण्यासाठी एप्रिल 2023 मध्ये अनुक्रमे सुखसागर हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस व छत्रधारी कॅटररला दोन वर्षांचे कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटाचा कालावधी 9 एप्रिल 2025 रोजी संपुष्टात आला. त्यानंतर या दोन्ही कंत्राटदारांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि आता ऑक्टोबर 2025पर्यंत दर महिन्याला सलग मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा 2025 ते 2027 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी नव्याने खानपान सेवा पुरवठादार नियुक्तीसाठी राबवण्यात येत असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण करून सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी आणखीन काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे सुखसागर व छत्रधारी कॅटरर्सला 10 ऑक्टोबर 2025 ते 9जानेवारी 2026 पर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

वर्षा निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी सुखसागर हॉस्पिटॅलिटीला साडेतीन कोटी रुपयांचे तर उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाच्या खानपान सेवेसाठी दीड कोटी रुपयांचे कंत्राट छत्रधारी कॅटरर्सला दिले होते. 10 एप्रिल 2023 ते 9 एप्रिल 2025 अशा दोन वर्षांसाठी हे कंत्राट दिले होते. पहिल्या वर्षात वर्षा बंगल्यावर साडेतीन कोटी रुपये आणि दुस ऱ्या वर्षात साडेतीन कोटी असे दोन वर्षांसाठी सात कोटी रुपयांचे पूर्वी टेंडर होते दोन्ही बंगल्यांचे एक वर्षाचे पाच कोटींचे आणि दोन वर्षांसाठी दहा कोटींचे टेंडर पूर्वी होते. सध्या तरी पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या दराने पुरवठा सुरू असल्याचे सांगण्यात येते.

पूर्वी निश्चित केलेले दर
चहाचा दर (125 एमएल) 18 रु.
कॉफी (125एमएल) 13 रु.
बटाटावडा (दोन) 27 रु.
चिकन-मटण बिर्याणी 35 रु.
व्हेज थाळी (फूल) 95 रु.
नॉनव्हेज थाळी (फूल) 98 रु.
स्पेशल व्हेज बुफे लंच 325 रु.
स्पेशल ब्रेकफास्ट बुफे 45 रु
स्पेशल व्हेज बुफे डिनर 160 रु.
स्पेशल नॉनव्हेज बुफे डिनर 160 रु.

Comments are closed.