बिहारमध्ये मुख्यमंत्री निवडीच्या हालचालींना वेग आला आहे
भाजपकडून शिवराज चौहान यांची निरीक्षकपदी नियुक्ती : ‘सत्तेचा खेळ’ तीव्र : नवा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत. नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून राजकीय हालचाली झपाट्याने वाढल्या आहेत. 14 एप्रिल रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी अपेक्षा आहे. यादरम्यान विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याची प्रक्रिया तीव्र झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चौहान भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनुसार, नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 15 एप्रिल रोजी पाटणा येथील लोक भवनात होऊ शकतो.
बिहारमध्ये पुढील दोन ते तीन दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असतील. नितीशकुमार सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक 14 एप्रिल रोजी होणार आहे. त्या दिवशी ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, असे मानले जात आहे. भाजपने विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू केली असून या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी टाकली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी यासंदर्भात एक अधिकृत पत्र जारी केले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या निर्देशानुसार त्यांच्यावर बिहारमधील विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नव्या नेत्याबाबत सस्पेन्स कायम
मुख्यमंत्रीपदाबाबतचा अंतिम निर्णय भारतीय जनता पक्ष घेईल आणि त्यांनी सुचवलेल्या नावावर एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहमती होईल. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांवर चर्चा होत असली तरी, अद्याप कोणताही एक उमेदवार निश्चित झालेला नाही. परिणामी, राजकीय वर्तुळापासून ते सामान्य जनतेपर्यंत प्रत्येकजण बिहारचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पाच-सहा नावांचा गांभीर्याने विचार केला जात आहे. यात सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय, जमुईच्या आमदार श्रेयसी सिंह, माजी प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल अशी बरीच नावे चर्चेत आहेत.
पुन्हा दोन उपमुख्यमंत्री?
जेडीयूच्या सूत्रांनुसार, यावेळी दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला अवलंबला जाऊ शकतो. विजय कुमार चौधरी यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे एक प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहे. दुसरे प्रमुख नाव निशांत कुमार असू शकतात, ज्यांचा राजकीय प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
Comments are closed.