मुख्यमंत्र्यांकडून मुंबईची मोकळी मैदाने ढापून मित्रांना, भाजप आमदाराला गिफ्ट; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, मोकळी मैदाने वाचवण्यासाठी रविवारी तिरंगा मोर्चाचे आयोजन
‘मुंबईची मोकळी मैदाने ढापून मुख्यमंत्री त्यांच्या मित्रांना, भाजप आमदाराला गिफ्ट करत आहेत. मुंबईकर म्हणून आपल्याला हे रोखावे लागणार, थांबवावे लागणार’, असे म्हणत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच मुंबईतील मोकळे भूखंड, नेव्हील डिसूझा फुटबॉल टर्फ वाचवण्यासाठी सर्व मुंबईकरांनी पक्ष, विचारधारा बाजूला ठेवून पुन्हा एकदा मुंबईसाठी मुंबईकर म्हणून क्रीडाप्रेमी, फुटबॉलप्रेमी म्हणून येत्या रविवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी पाच वाजता रंगशारदा समोर नेव्हील डिसूझा फुटबॉल टर्फ येथे एकत्र येण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स (शहाजी राजे क्रीडा संकुल) मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘हारूनजी यांच्या पत्नी या भागातील नगरसेविका होत्या. तेव्हा महापालिकेत आमची सत्ता होती तेव्हा या मोकळ्या मैदानाचा विकास केला गेला. तसंच मी पर्यावरण मंत्री असताना हजारो झाडं लावून इथे आम्ही शहरी जंगल केलेलं आहे. महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूचे सर्व नागरिक इथे येऊन मोकळा श्वास घेतात. इथे वॉकिंग, सायलिंग ट्रॅक आहे. कुठेही खासगीकरण न करता मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हे मैदान असंच मोकळं होतं’. मात्र मुंबईतील मोकळा भूखंड संबंधिताना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला आदेश दिला असल्याचे आपल्या कानावर आले असून मुंबईकर म्हणून याविरोधात एकत्रं येणे गरजेचे आहे असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
यावर अधिक बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, तसं पाहायला गेलं तर दहा वर्षांपूर्वी या प्लॉटची किंमत साडेपाचशे कोटी रुपये होती. पण या प्लॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला 21 लाख प्रति वर्ष या किमतीवर गिफ्ट दिले आहे.
आपल्याला सरकारचे धोरण दिसत आहे. मग २२ बस डेपो असो किंवा असे प्लॉट असतील हे मुख्यमंत्री स्वत:च्या मित्रांना द्यायला लागले असतील तर हा घोटाळा, हा भ्रष्टाचार उघड उघड दिसत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
या पत्रकार परिषदेवेळी आदित्य ठाकरे यांनी आपण आमदार किंवा ट्रस्टचे नाव घेत नसल्याचे सांगितले. आपले भांडण हे आमदार किंवा संबंधित ट्रस्टशी नाही तर आपले भांडण ही प्रक्रिया, भ्रष्टाचार आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयासोबत आहे. तसेच हे भाजपच नाही तर कुठच्याही पक्षाच्या आमदाराला आरजी, पीजी प्लॉट दिला नाही पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे या मुद्द्यावर अधिक बोलताना म्हणाले, मुख्य गोष्ट हीच आहे भाजपला मुंबई महानगरपालिका याचसाठी घ्यायची होती. कारण अशी मोकळी मैदानं, अशा मोकळ्या जागा जिथे तुम्ही श्वास घेऊ शकता मुंबईकर म्हणून चालायला जाऊ शकता. या सर्व जागा घेऊन त्यांचं खासगीकरण करायचे आहे. याचा आम्ही विरोध करत आहोत. विरोध करत राहू आणि मुंबईकर म्हणून रस्त्यावर उतरून विरोध करू. कारण हे जोपर्यंत मागे घेत नाहीत. मुख्यमंत्री या भूखंडाचे घोटाळे थांबवत नाहीत तोपर्यंत आम्ही याचा विरोध मुंबईकर म्हणून करू.
येत्या रविवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी पाच वाजता रंगशारदा समोर नेव्हील डिसूजा फुटबॉल टर्फ येथे एकत्र येण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. सर्व मुंबईकरांनी पक्ष, विचारधारा बाजूला ठेवून पुन्हा एकदा मुंबईसाठी मुंबईकर म्हणून क्रीडाप्रेमी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. आपण तिरंगा घेऊन एकत्र येऊ असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
Comments are closed.