चीन पाकिस्तानला उपग्रह सहाय्य प्रदान करते

भारतीय थिंक टँकचा खुलासा : दोन आघाड्यांवर लढाईची शक्यता वाढली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात चीनने उघडपणे पाकिस्तानचे समर्थन केले होते. चीनने पाकिस्तानला केवळ कूटनीतिक नव्हे तर सैन्य समर्थनही दिले होते आणि चीनने पाकिस्तानी सैन्याला उपग्रहीय सहाय्य पुरविले होते असा खुलासा आता झाला आहे. भारतीय थिंकटँकचा दाखला देत ब्लूमबर्गने  हा दावा केला आहे. चीनने पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणा आणि रडारला योग्य ठिकाणी तैनात करण्यासाठी स्वत:च्या उपग्रहांची मदत पुरविली होती. भारताच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईपासून पाकिस्तानला वाचविण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले होते.

चीनकडून पाकला उघड मदत

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात प्रत्युत्तरादाखल कारवाईची योजना आखण्यास सुरुवात केली होती. याच 15 दिवसांच्या कालावधीत चीनने पाकिस्तानला स्वत:च्या उपग्रहांद्वारे मदत केली होती. भारताच्या शस्त्रास्त्रांची तैनात पाकिस्तानला कळावी यासाठी चीनने हे पाऊल उचलले होते. चीनच्या उपग्रहीय मदतीमुळे पाकिस्तानला स्वत:ची हवाई सुरक्षा यंत्रणा आणि रडार पुन्हा व्यवस्थित करण्यास मदत मिळाल्याचे भारताचा थिंक टँक ‘सेंटर फॉर जॉइंट वॉरफेयर स्टडीज’शी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.  भारत सरकारने या संघर्षात चीन सामील असल्याचे वक्तव्य जाहीरपणे केलेले नाही, परंतु पाकिस्तानने या संघर्षात चिनी शस्त्रास्त्रांचा वापर केल्याची जाहीर कबुली दिली आहे.

महत्त्वपूर्ण थिंक टँक

चीनने कूटनीतिक समर्थनाच्या पुढे जात पाकिस्तानला लॉजिस्टिक आणि गुप्तचर मदतीसोबत सैन्य मदत  पुरविली असल्याचे भारतीय थिंक टँकने स्पष्ट केले आहे. सेंटर फॉर जॉइंट वॉरफेयर स्टडीज या थिंक टँकच्या सल्लागार मंडळात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख सामील असतात, यातून या थिंक टँकच्या अहवालाचे महत्त्व समजू शकते.

चीनच्या हवाई सुरक्षा यंत्रणा निष्प्रभ

पाकिस्तानचे विदेशमंत्री इशाक डार हे सोमवारी चीनमध्ये पोहोचले आहेत. चीनने भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान एकप्रकारे स्वत:च्या शस्त्रास्त्रांचे परीक्षण करण्याचा प्रयत्न केला, परंतु चीनच्या हवाई सुरक्षा यंत्रणेची कामगिरी अत्यंत खराब राहिली. तर भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाकचे जवळपास सर्व हवाई हल्ले हाणून पाडल्याचे थिंक टँकशी संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे.भारताला यापूर्वीच दोन आघाड्यांवर लढाईची शंका होती, परंतु आता ज्याप्रकारे चीनने पाकिस्तानचे समर्थन केले, ते पाहता ही शंका बळावली आहे आणि भारत देखील या दिशेने योजना आखत आहे.

Comments are closed.