अमेरिकेला युद्धच हवे असेल तर आम्हीही तयार, चीनची डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी

अमेरिकेला जर युद्धच हवे असेलमग ते व्यापारयुद्ध असो किंवा आणखी कुठल्याही प्रकारचे युद्ध… तर आम्हीही तयार आहोत, अशा शब्दांत चीनने अमेरिकेच्या जशास तशा आयात शुल्क लादण्याच्या धोरणावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी चीनवर 10 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयात शुल्काबाबत चीनची भूमिका स्पष्ट केली.

आम्ही अमेरिकेशी शेवटपर्यंत लढण्यासाठी तयार आहोत, आम्ही अमेरिकेला घाबरत नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले आहे. आमच्यावर दादागिरीचा काहीच उपयोग होणार नाही. दबाव, जबरदस्ती किंवा धमकी हा चीनशी लढण्याचा योग्य मार्ग नसल्याचे जियान यांनी नमूद केले आहे. अमेरिकेने फेब्रुवारीच्या सुरुवातीला चीनवर 10 टक्के आयात शुल्क लागू केले होते. त्यानंतर एक महिन्याने पुन्हा एकदा 10 टक्के अतिरिक्त आयातशुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर चीन संतापला असून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी एक्सवर पोस्ट करून अमेरिकेला उत्तर दिले आहे.

फेंटेनाइलबद्दल पसरवली खोटी माहिती

अमेरिका फेंटेनाइलसारख्या धोकादायक औषधाच्या मुद्दय़ावरून विविध प्रकारची खोटी माहिती पसरवत आहे. या माध्यमातून चीनला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. फेंटेनाईलच्या बहाण्याने चीनच्या वस्तूंवर अतिरिक्त आयातशुल्क लादण्यात येत आहे. अमेरिकेने हे चुकीचे पाऊल उचलले असून फेंटेनाइल या औषधाला चीनने पूर्वीच नशेसाठी वापर होणाऱ्या औषधांच्या यादीत टाकले आहे याकडे चीनने जगाचे लक्ष वेधले आहे. अशाप्रकारे पाऊल उचलणारा चीन हा पहिला देश ठरल्याचेही सांगण्यात आले आहे.

2 एप्रिलपासून हिंदुस्थानवर 100 टक्के आयातशुल्क- ट्रम्प

येत्या 2 एप्रिलपासून हिंदुस्थानवर रेसिप्रोकल आयातशुल्क धोरणानुसार तब्बल 100 टक्के आयातशुल्क लागू करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. अमेरिकन संसदेच्या संयुक्त बैठकीत त्यांनी याबाबतची घोषणा केली. ते म्हणाले पुन्हा एकदा अमेरिकेची वेळ आली आहे. आपण जे काही 43 दिवसांत केले आहे ते इतर देशांचे सरकार 4 किंवा 8 वर्षांच्या कार्यकाळातही करू शकलेले नाही, असेही ट्रम्प म्हणाले. दरम्यान, 2021 मध्ये अफगाणिस्तानात दहशतवाद्यांनी 12 अमेरिकन सैनिकांची हत्या केली होती. त्यांना पकडण्यासाठी पाकिस्तानने मदत केल्याबद्दल ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले.

Comments are closed.