अब आया ऊंट…! दुर्मिळ खनिजांच्या मुद्द्यावर ड्रॅगनविरोधात अमेरिकेला हवीय हिंदुस्थानची मदत
टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिका हिंदुस्थान संबंध ताणले गेले आहेत. त्यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100 टक्के टॅरिफ लादला आहे. मात्र, अमेरिकेच्या या टॅरिफच्या धमकीला न जुमानता चीनने अमेरिकेलाही जशास तसे उत्तर दिले आहेत. त्यामुळे आता ट्रम्प यांनी ड्रॅगनविरोधात युरोपीय देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच या मुद्द्यावर त्यांना हिंदुस्थानचीही मदत हवी आहे. त्यामुळे हा संघर्ष चीनविरोधात जग असा असल्याचे चित्र अमेरिकेकडून रंगवले जात आहे.
चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर नियम कडक केले आहेत, ज्यामुळे अमेरिकेतील तणाव वाढला आहे. दुर्मिळ खनिजे ही अमेरिकेच्या लष्करी तंत्रज्ञानाचा पाया आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, सध्या अमेरिकेच्या दुर्मिळ पृथ्वी खनिज आयातीपैकी सुमारे 70 टक्के आयात चीनमधून होते. जगात सध्या एक नवीन राजकीय आणि आर्थिक परिस्थिती उदयास येत आहे. दुर्मिळ खनिजांवर चीनचे नियंत्रण रोखण्यासाठी हिंदुस्थान आणि युरोपने एकत्र यावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे. विशेष म्हणजे अमेरिका- हिंदुस्थानमध्ये टॅरिफवरून तणाव असताना ट्रम्प यांना हिंदुस्थानची मदत हवी आहे.
अमेरिका चीनच्या दुर्मिळ खनिजांवरील नियंत्रण कसे रोखणार? असा प्रश्न अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, या मुद्द्यावर आम्हाला हिंदुस्थान आणि युरोपीय देशांकडून पाठिंबा अपेक्षित आहे. मात्र, अमेरिकेचे स्वतःचे व्यापार धोरण पाहता, त्यांचे हे वक्तव्य विरोधाभासी मानले जात आहे. अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के कर लादला आहे आणि चीनविरुद्ध एकत्र येण्याची अपेक्षा आहे.
बेसंट यांनी चीन- अमेरिका संघर्षाला जागतिक युद्धाचे स्वरुप दिले आहे. ते म्हणाले, हा संघर्ष चीन विरुद्ध जग असा आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. चीन ही कमांड-अँड-कंट्रोल अर्थव्यवस्था आहे. आम्ही विविध माध्यमांद्वारे आमचे सार्वभौमत्व दाखवून देऊ. आम्ही मित्र राष्ट्रांशी संपर्कात आहोत. या मुद्द्यावर आम्हाला युरोपियन देश, हिंदुस्थान, आशियाई देशांकडून आणि जागतिक स्तरावर पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.
बेझंट यांनी चीनवर आक्रमक कृती आणि युद्धाला निधी देण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर चीनची बंदी केवळ अमेरिकेसाठीच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही धोका निर्माण करते. अमेरिका जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर चीन युद्धाला निधी देत आहे, असा दावाही त्यांनी केला. गेल्या आठवड्यात, अमेरिकेने निर्यात नियमांचा विस्तार केल्याने चीनने अमेरिकन जहाजांवर शुल्क लादले. दुर्मिळ खनिज निर्यातीवरील चीनच्या नवीनतम निर्बंधांमुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळे या संघर्षाला जागितक रंग देत पाठिंबा मिळवण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
Comments are closed.