चिनी सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेला धोका निर्माण करतात
भारताकडून गंभीर नोंद, विशिष्ट कॅमेऱ्यांवर बंदी
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या सुरक्षेला चीनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने नुकतीच या कॅमेऱ्यांवर बंदी घातली असून ज्या कॅमेऱ्यांमध्ये चीनी बनावटीचे चिपसेट्स् आहेत, त्यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घाईगडबडीने घेतलेला नाही. तर पूर्ण माहिती घेऊन आणि चीनचे डावपेच लक्षात घेऊन घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
चीनच्या या उद्योगांमध्ये पाकिस्तानही समाविष्ट आहे. या दोन्ही देशांनी एकत्र येऊन भारतात चीनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गुप्तहेरगिरी चालविली असल्याची माहिती उघड होत आहे. या दोन्ही देशांनी भारतात गुप्तहेरगिरीचे जाळे पसरविल्याचा संशय व्यक्त होत असून आता केंद्र सरकारने त्याच्या मुळावर घाव घालण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. अलिकडच्या काळात काही व्हिडीओज आणि फोटो प्रसारित झाले आहेत. ते भारताच्या महत्वाच्या विभागांच्या कार्यालयांमधील आहेत. या कार्यालयांमध्ये चीनी बनावटीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून कार्यालयांच्या संमतीखेरीज ते प्रसिद्ध करण्यात आले असल्याने संशय बळावला आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्यात आली आहे.
माहिती जाते विदेशात
चीनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रीत करण्यात आलेली माहिती केवळ तो कॅमेरा बसवून घेणाऱ्यापुरती मर्यादित रहात नाही. ती थेट चीनला पोहचते. तसेच ज्या कारणांसाठी हा सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेला असतो, त्यांच्याशिवाय तो इतर बऱ्याच (नको त्या) बाबीही ‘पहात’ असतो आणि चित्रीत करत असतो. चित्रीत करण्यात आलेला हा डाटा चीनपर्यंत आणि पाकिस्तानपर्यंतही पोहचतो, असे अन्वेषणात आढळून आलेले आहे. हे अत्यंत गंभीरपणे घेण्यात आलेले आहे.
व्यापक चौकशीस प्रारंभ
भारत सरकारच्या तसेच विविध राज्यसरकारांच्या महत्वाच्या विभागांमध्ये, ज्या विभागांमध्ये चालणारे काम गुप्त राहणे आवश्यक असते, अशा स्थानी अनेक चीनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या व्यापक चौकशी करण्यास आता प्रारंभ करण्यात आला आहे. विदेशी बनावटीच्या कॅमेऱ्यांवरच आता देखरेख ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेशात 6 जणांना अटक
चीनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून हेरगिरी होण्याचा प्रकार प्रथम उत्तर प्रदेशात उघडकीस आला. या हेरगिरी जाळ्याचा मास्टरमाईंड मुनीर याला अटक करण्यात आली आहे. त्याची सहकारी साने इराम ऊर्फ मेहक हिचे भारताबाहेरच्या सूत्रधारांशी संबंध असल्याचे आढळून आले. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या हेरगिरीचे जाळे पसरविण्यासाठी स्थानिक तरुणांचे साहाय्य घेतले जाते. हे तरुणांना या कटकारस्थानाची माहिती नसते. त्यामुळे ते अनभिज्ञपणे अशा सूत्रधारांना साहाय्य करतात. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाचे नाव अझीम राणा याच्याकडे उत्तर प्रदेशातील काही मंदिरे आणि हिंदूंच्या धार्मिक स्थळांची चित्रीकरणे आढळून आली आहेत. व्यापक चौकशी होत आहे.
सावध राहण्याची आवश्यकता
ड गुप्तहेरगिरीचे हे जाळे सर्वसामान्यांच्या घरांपर्यंतही पसरलेले असू शकते
ड सरकारची गुपितेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून विदेशात पोहचणे आहे शक्य
ड उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये हा प्रकार उघडकीस, सहा जण अटकेत
ड ज्या कॅमेऱ्यांना भारत सरकारचे प्रमाणपत्र आहे, त्यांनाच मिळणार अनुमती
ड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये असू शकतात गुप्त उपकरणे, ज्यांच्यामुळे हेरगिरी
ड इंटरनेट कनेक्टेड कॅमेरेही धोकादायक, चित्रीकरण थेट पोहचते विदेशांमध्ये
Comments are closed.