हिंदुस्थान सरकारचा मोठा निर्णय, चिनी नागरिकांना आता व्हिसा मिळणार

पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हिंदुस्थान सरकारने चिनी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्याची घोषणा केली आहे. ही प्रक्रिया (24 जुलै) पासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. बीजिंगमधील हिंदुस्थानी दूतावासाने बुधवारी (23 जुलै) या निर्णयाची माहिती दिली. मार्च 2020 मध्ये, कोविड-19 साथीच्या काळात संसर्ग रोखण्यासाठी हिंदुस्थानने सर्व पर्यटक व्हिसा तात्पुरते निलंबित केले होते. तेव्हापासून चिनी नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली होती.
जून 2020 मध्ये कोविड-19 मुळे आणि गलवान खोऱ्यात हिंदुस्थान आणि चीनमधील हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील प्रवास आणि परस्पर संपर्क जवळजवळ थांबला होता. गेल्या काही वर्षांत चीनने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना व्हिसा देण्यास सुरुवात केली होती, परंतु सामान्य प्रवासावरील निर्बंध कायम होते.
गलवान खोऱ्यातील घटनेनंतर, 1962 च्या युद्धानंतर दोन्ही देशांमधील विकोपाला गेले होते. नंतर राजनैतिक आणि लष्करी चर्चेच्या अनेक फेऱ्यांद्वारे सैन्याने पॅंगोंग लेक, गलवान आणि हॉट स्प्रिंग्स सारख्या अनेक तणावपूर्ण भागातून माघार घेतली. ऑक्टोबर 2024 मध्ये, देपसांग आणि देमचोक भागातून सैन्य मागे घेण्याचा करारही झाला होता. काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची रशियातील कझान येथे भेट झाली. द्विपक्षीय संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
आता हिंदुस्थान आणि चीन दोघांनाही नागरिकांशी संपर्क वाढवायचा आहे. यासाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची आणि कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याची योजना आहे. कोविडमुळे ही यात्रा थांबली होती. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी असेही म्हटले आहे की, हिंदुस्थान चीन संबंध हळूहळू योग्य दिशेने जात आहेत.
Comments are closed.