चिनी तंत्रज्ञांनी भारत सोडण्याचा आदेश दिला
फॉक्सकॉन कंपनीचा निर्णय, उत्पादनावर परिणाम
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतात अॅपलचे आयफोन्स निर्माण करणाऱ्या फॉक्सकॉन या कंपनीने भारतात काम करणाऱ्या चिनी तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना भारत सोडण्याचा आदेश दिला आहे. यामुळे या कंपनीच्या भारतातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चीनमधील आपले पुष्कळसे उत्पादन भारतात हलविण्याची महत्वाकांक्षी योजना अॅपल कंपनीने बनविली आहे. या योजनेला खीळ घालण्यासाठी चीननेच आपल्या तंत्रज्ञानांना हा आदेश दिला असावा, अशीही चर्चा आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी तणाव निर्माण झाल्याने अनेक अमेरिकन कंपन्या चीनमधून बाहेर पडण्यास सज्ज असल्याचे बोलले जात आहे. अॅपल कंपनी लवकरच भारतात आपल्या ‘आयफोन 17’ च्या उत्पादनास प्रारंभ करणार आहे. तथापि, चिनी तंत्रज्ञ भारतातून बाहेर गेल्याने कदाचित कंपनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण, चिनी तंत्रज्ञांना या उत्पादनाची माहिती आहे. भारतीय तंत्रज्ञ आणि अभियंते या उत्पादनास कितपत सज्ज आहेत, यासंबंधी माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, आता हे आव्हान भारतीय तंत्रज्ञांना स्वीकारावे लागणार असून कंपनीलाही तशी योजना आणावी लागणार आहे.
चीनचे डावपेच
आपण अमेरिकेकडून मिळविलेले तंत्रज्ञान अन्य देशांना मिळू नये आणि त्या देशांमध्ये या तंत्रज्ञानाचे तंत्रज्ञ निर्माण होऊ नयेत, यासाठी चीनने आपल्या तंत्रज्ञांना विदेशांमधून माघारी बोलाविण्याची चाल रचलेली आहे. विशेषत: भारत आणि अग्येय आशियातील देश चीनला या संदर्भात स्पर्धा करीत आहेत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या चीनने हे डावपेच आखलेले आहेत. विदेशांमधील कारखान्यांमधील काम सोडून परत यावे, असा दबाव चीनने आपल्या तंत्रज्ञांवर आणला आहे, असे वृत्त काही विदेशी वृत्तसंस्थांनी दिले आहे. याचाही परिणाम होत आहे.
तंत्रज्ञान हस्तांतरणातही बाधा
आयफोनसारखी उत्पादने करण्यास अत्याधुनिक यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. ही यंत्रसामग्रीही चीनमध्ये बनते. आता केवळ तंत्रज्ञच नव्हे, तर ही यंत्रसामग्रीही चीनबाहेर जाऊ नये, असे धोरण चीनने स्वीकारलेले आहे. अशा प्रकारे कुशल तंत्रज्ञ आणि साधनसामग्री अशा दोन्ही आघाड्यांवर आपल्या प्रतिस्पर्धी देशांची कोंडी करण्याचा चीनचा हा डाव किती यशस्वी होतो, हे येत्या काही काळात समजून येईल. जर भारताच्या तंक्षज्ञांनी आणि अभियंत्यांनी प्रशिक्षण घेऊन हे आव्हान स्वीकारले, तर मात्र, चीनचीही कोंडी होईल, असे तज्ञांचे मत आहे.
भारतात 20 टक्के उत्पादन
अत्याधुनिक अशा आयफोन्सच्या एकंदर उत्पादनापैकी 20 टक्के उत्पादन भारतात केले जाते. भारतात अनेक स्थानी अॅपलची उत्पादनकेंद्रे आहेत. ती प्रामुख्याने अॅपलची उपकंपनी असणाऱ्या फॉक्सकॉनच्या माध्यमातून चालविली जातात. तथापि, भारतातील उत्पादन केंद्रांमध्येही चिनी तंत्रज्ञ महत्वाच्या पदांवर काम करतात. आता या तंत्रज्ञांना लवकरात लवकर पर्याय शोधावा लागणार आहे. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बहुतेक आयफोन्सचे उत्पादन भारतात करण्याची अॅपलची योजना आहे. 2026 पर्यंत चीनमधील उत्पादन केंद्रे मोठ्या प्रमाणावर भारतात आणण्याचीही या कंपनीची योजना असल्याची माहिती दिली गेली आहे. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयफोन्सचे उत्पादन अमेरिकेतच व्हावे असा आग्रह अॅपलकडे धरला आहे. मात्र, अमेरिकेतही यासंदर्भातील कुशल तंत्रज्ञांची वानवा आहे. त्यामुळे अॅपलने आता भारतावर लक्ष केंद्रीत केले आहे.
Comments are closed.