चिपळूण शिरगाव ग्रामपंचायतीत 1 लाख 43 हजारांचा अपहार, करवसुलीची रक्कम स्वतःसाठी वापरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करवसुलीच्या शासकीय रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून तब्बल १ लाख ४३ हजार ६९ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत शिरगाव ग्रामपंचायत कार्यालयात हा गैरव्यवहार घडला असून, याप्रकरणी नीता निलेश शिंदे (वय ३३, रा. पाटीलवाडी, शिरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणात धनंजय दत्ताराम सोलकर (३३), दिनेश दत्ताराम धागडे (४२) आणि श्रीकृष्ण गंगाराम कदम (वय ५०, सर्व रा. शिरगाव, ता. चिपळूण) या तिघांवर फौजदारीपात्र न्यास भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने या तिघांवर गावातील ग्रामस्थांकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीज कर वसूल करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नियमानुसार वसूल केलेली सर्व रक्कम ग्रामपंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शिरगाव येथील बचत खाते क्रमांक १४०२००६०२०७०४ वर तातडीने जमा करणे बंधनकारक होते. मात्र, संशयित आरोपींनी ग्रामस्थांकडून गोळा केलेली १ लाख ४३ हजार ६९ रुपयांची रक्कम शासकीय खात्यात जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुमारे सात महिने स्वतःजवळ बाळगून तिचा वापर करत निधीचा अपहार केला.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील विविध परिपत्रके आणि शुद्धिपत्रकांनुसार ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांत झालेली ही गंभीर अनियमितता आणि निधीचा झालेला अपहार तपासात समोर आला आहे. शासकीय कामाचा गैरफायदा घेऊन करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, अलोरे शिरगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Comments are closed.