चिरग पासवान बिहारमधील 25 जागांवर सहमत आहे?
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर रालोआत मोठी सहमती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान हे अधिक जागांच्या मागणीवर अडून बसल्याची चर्चा काही दिवसांपासून होती, परंतु आता पासवान हे स्वत:च्या पक्षाकरता 25 जागांवर सहमत होऊ शकतात असा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. याच्या बदल्यात पासवान यांना भाजपकडून केंद्र तसेच बिहार सरकारमध्ये अधिक महत्त्व आणि मंत्रालये देण्याचे आश्वासन मिळाले आहे. याचबरोबर पासवान यांच्या पक्षाला एक राज्यसभेची जागाही दिली जाऊ शकते. भाजपकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर पासवान हे 25 जागांचा प्रस्ताव मान्य करू शकतात. याचे संकेत पासवान यांच्या वक्तव्यातूनही मिळत आहेत. रालोआत सर्वकाही सुरळीत असून लवकरच जागावाटपाची घोषणा केली जाईल असे पासवान यांनी म्हटले आहे.
सध्या कुठल्याही पक्षाकडून अधिकृतपणे काहीच सांगण्यात येत नसले तरीही 25 जागांवर चिराग सहमत होणार असल्याचे मानले जात आहे. लोजप आणि भाजप यांच्यात गुरुवारी बैठक झाली होती, यात दोन्ही पक्षांचे नेते दिवसभर चर्चा करत होते. या बैठकीत केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, धर्मेंद्र प्रधानही सामील होते. या बैठकीनंतरच पासवान यांनी जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना कमीतकमी 20 दिवसांचा कालावधी प्रचारासाठी मिळावा अशी भाजपची इच्छा आहे. याचमुळे रालोआत जागावाटप लवकर करण्यावर जोर देण्यात येत आहे. जीतनराम मांझी, चिराग पासवान यासारख्या घटक पक्षांच्या नेत्यांची सहमती मिळविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. लोजपची विजयाची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत अत्यंत अधिक राहिली असल्याने अधिक जागा देण्यात याव्यात असे पासवान यांचे म्हणणे आहे. चिराग पासवान हे मुख्यमंत्री होण्याची आकांक्षा बाळगून असल्याचे बोलले जात आहे.
Comments are closed.